कन्याशाळेत मुख्याध्यापक दारूच्या नशेत; अचानक शिक्षण मंत्र्यांचा दौरा अन् झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:47 PM2023-08-09T15:47:07+5:302023-08-09T15:47:31+5:30
पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी अचानक मुलींच्या शाळेत दौरा करून मुख्याध्यापकांचा पर्दाफाश केला.
नवी दिल्ली : पंजाबचेशिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी अचानक मुलींच्या शाळेत दौरा करून मुख्याध्यापकांचा पर्दाफाश केला. खरं तर बैंस त्यांच्या विधानसभा मतदारसंघात शाळांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान ते मुलींच्या शाळेत गेले असता शाळेचे मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. मुख्याध्यापकांच्या कृत्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांनी या शाळेतील विद्यार्थिनींशी चर्चा करून सद्य स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह सोमवारी देर गावातील सरकारी कन्याशाळेत गेले होते. मंत्री महोदय शाळेत जाताच शाळेचे मुख्याध्यापक दारूच्या नशेत आढळून आले. ते दररोज मद्यधुंद अवस्थेत शाळेत पोहोचतात, अशा तक्रारी अनेकांनी बैंस यांच्याकडे केल्या होत्या. ही तक्रार गांभीर्याने घेत बैंस यांनी शाळा गाठली. मुख्याध्यापकांना पाहताच ते दारूच्या नशेत होते. कठोर कारवाईच्या सूचना देत त्यांनी या लज्जास्पद कृत्यासाठी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी केवळ मुख्याध्यापकांवरच कारवाई केली नाही, त्यानंतर उर्वरित शिक्षकांशी देखील चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावर संतप्त झालेल्या शिक्षणमंत्र्यांनी त्यांना खडसावले आणि सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली. एवढेच नाही तर त्यांनी इतर शिक्षकांना फटकारले असून मुलं जेव्हा मुख्याध्यापकांबद्दल तक्रार करत आहेत तेव्हा इतर शिक्षकांनी ही वस्तुस्थिती लपवायला नको होती, अशा शब्दांत बैंस यांनी शिक्षकांना धारेवर धरले.
मुख्याध्यापकांचा माफीनामा
दरम्यान, शिक्षण मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा पाहून संबंधित मुख्याध्यापकांनी आपली चूक मान्य केली. मुख्याध्यापक कुलदीप सिंह यांनी आपली चूक मान्य केल्याचे सांगितले जात आहे. शिक्षणमंत्र्यांसमोर चूक मान्य करत मुख्याध्यापकांनी हात जोडून माफी मागितली. या संपूर्ण घटनेनंतर बैंस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि शाळेसाठी नवीन पायाभूत सुविधांसाठी एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. बैंस यांच्या या दौऱ्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले.