Punjab Election 2022: ‘ग म भ न’ ही न येणारे पंजाबमध्ये ४९ उमेदवार; दहशत, मतांसाठी पैसे वाटण्याचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:36 AM2022-02-18T07:36:37+5:302022-02-18T07:37:12+5:30
देशातील प्रगत राज्य म्हणून पंजाबची वेगळीच प्रतिमा लोकांत आहे. परंतु, त्या प्रतिमेला अमृतसर, जालंदर अशा कोणत्याही मोठ्या शहरात उतरले की धक्का बसतो.
विश्वास पाटील
अमृतसर : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत साधे ग.म.भ.न.ही न येणारे तब्बल ४९ उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल ५४ टक्के उमेदवार हे कसेबसे पाचवी ते बारावीपर्यंत शिकले आहेत. हे राज्य येत्या रविवारी (दि. २०) एकाच टप्प्यात मतदानाला सामोरे जात आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात प्रचाराचा धुरळा उडाला. मतांसाठी पैसे, दहशतीचे प्रकारही सर्रास चालत असल्याचे स्थानिक लोकांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) व पंजाब इलेक्शन वॉच या संस्थांनी एकूण १३०४ उमेदवारांनी स्वत:हून भरलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून त्याची माहिती येथे जाहीर केली. रिंगणातील ४८३ (३८ टक्के) मतदार हे पदवीधर किंवा त्याहून जास्त शिकलेले आहेत. २५ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. निम्मे मतदारसंघ असे आहेत की, तिथे रिंगणातील तीन किंवा त्याहून जास्त उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. निवडणूक लढवत असलेले ५४१ उमेदवार करोडपती आहेत. उमेदवाराची सरासरी मालमत्ता साडेचार कोटी रुपये आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातील उमेदवारांची संख्या (५० टक्के) पंजाबच्या तुलनेत जास्त आहे.
प्रतिमेला धक्का
देशातील प्रगत राज्य म्हणून पंजाबची वेगळीच प्रतिमा लोकांत आहे. परंतु, त्या प्रतिमेला अमृतसर, जालंदर अशा कोणत्याही मोठ्या शहरात उतरले की धक्का बसतो. एक प्रकारचे बकालपण अनेक ठिकाणी दिसते. एका बाजूला नव्या कोऱ्या कार सगळीकडे सुसाट पळताना दिसतात आणि त्याचवेळेला सायकलरिक्षा ओढून घामाघाम झालेला गरीब दिसतो. अमृतसरसारख्या शहरात अनेक ठिकाणी जुन्या मुस्लिम संस्कृतीच्या खुणा दिसतात.