Punjab Election 2022: ‘मी टू’मध्ये चन्नी यांना मदत केल्याचा पश्चात्ताप; अमरिंदर सिंग यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 06:11 AM2022-01-23T06:11:00+5:302022-01-23T06:11:44+5:30
Punjab Election 2022: मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड :पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मी- टू प्रकरणात मदत केल्याचा आता पश्चात्ताप होत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. चन्नी यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते.
कॅ. अमरिंदर सिंग यांनी यावर खंत व्यक्त करत म्हटले आहे की, त्यावेळी चन्नी यांनी माझ्यापुढे शरणागती पत्करत मदत मागितली होती. चन्नी यांच्यावर २०१८ मध्ये एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आरोप केले होते. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी मागील वर्षी मेमध्ये अमरिंदर सिंग सरकारकडून उत्तर मागविले होते. नंतर चन्नी यांनी त्या महिला अधिकाऱ्याची माफी मागितली
होती. पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅ. अमरिंदर सिंग यांनी चन्नी सरकारचा उल्लेख सुटकेस सरकार असा केला आहे.
काँग्रेसच्या तिकीट वाटपाची प्रतीक्षा : भाजपा आणि संयुक्त अकाली दल यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही कॅ. अमरिंदर सिंग यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. यावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून जाहीर होणाऱ्या यादीची प्रतीक्षा करत आहोत. काँग्रेस जाणीवपूर्वक उशीर करत आहे. कारण, त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार त्यानंतर दूर जातील.