Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:14 PM2022-03-10T14:14:39+5:302022-03-10T14:15:25+5:30
Punjab Election Result 2022 : पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे.
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा विजय मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टी जवळपास 90 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबच्या या विजयाचा राज्यसभेत आम आदमी पार्टीला मोठा फायदा होऊ शकतो. जुलैपर्यंत आम आदमी पार्टी पंजाबमधून राज्यसभेच्या सात जागा जिंकू शकते. आम आदमी पार्टीला सातही जागा जिंकण्यात यश आले तर राज्यसभेतील त्यांच्या खासदारांची संख्या 10 होईल.
दरम्यान, पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. या पाच जागांवर निवडणूक आयोगाकडून मार्चअखेर निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राज्यसभेच्या खासदाराच्या जागेसाठी 18 ते 20 आमदारांचे मत आवश्यक आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या चार राज्यसभेतील खासदारांचा विजय निश्चित आहे.
तसेच, काँग्रेसचा एकही सदस्य निवडणूक जिंकू शकेल, अशा स्थितीत दिसत नाही. पंजाबमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होणार आहे. आम आदमी पार्टी या दोन्ही जागा आरामात जिंकू शकते. अशाप्रकारे आम आदमी पार्टी जुलैअखेर पंजाबमधून राज्यसभेच्या 7 जागा जिंकू शकते.
राज्यसभेत 'आप'ची स्थिती मजबूत होईल
आम आदमी पार्टीचे दिल्लीतून तीन राज्यसभा खासदार आहेत. जर आम आदमी पार्टी सर्व 7 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती 10 राज्यसभा खासदारांसह सभागृहात आपली ताकद वाढवेल. मात्र, पंजाबच्या संगरूर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला मैदानात उतरावे लागू शकते. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान या जागेवरून खासदार असून त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ही जागा सोडावी लागणार आहे. मात्र, संगरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा जागांवर आम आदमी पार्टीने जोरदार विजय नोंदवला आहे.