Punjab Election Result 2022: 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम मजिठियांचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:37 PM2022-03-10T17:37:59+5:302022-03-10T17:39:54+5:30
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे आणि समोर आलेल्या कलानुसार जवळपास एक तृतियांश बहुमत 'आप'नं प्राप्त केलं आहे.
चंदीगढ-
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे आणि समोर आलेल्या कलानुसार जवळपास एक तृतियांश बहुमत 'आप'नं प्राप्त केलं आहे. पंजाबमध्ये यंदा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यात अमृतसर पूर्व मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. या मतदार संघात 'आप'च्या जीवन ज्योत कौर 'जाएंट किलर' ठरल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांचा जीवनज्योत कौर यांनी पराभव केला आहे.
पॅड वूमन' अशी ख्याती असलेल्या जीवनज्योत कौर यांनी या दोघांनाही मात दिली. जीवनज्योती कौर या पंजाबमधील तुरुंगातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन देतात. तसेच त्या गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी मान्य केला आहे. सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले आहे.
S.H.E या सेवाभावी संस्थेच्या संस्थापक
जीवनज्योत कौर या S.H.E नावाच्या सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गरीब कल्याणासाठी काम केलं जातं. जीवन ज्योत कौर यांनी एका परदेशी कंपनीसोबत करार केला असून या मार्फत ग्रामीण महिलांना पुर्नवापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन दिले जातात.
मुलगी डेन्टिस्ट तर मुलगा हायकोर्टात वकील
आम आदमी पक्षाचे नेते जीवनज्योत कौर यांच्या कन्या दातांच्या डॉक्टर आहेत. तर मुलगा हायकोर्टात वकील आहे. निवडणूक प्रचारावेळी त्यांच्या दोन्ही मुलांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. याशिवाय कौर यांचे आई-वडील, पती आणि सासू-सासऱ्यांनीही घरोघरी जाऊन प्रचार केला होता.