Punjab Election Results 2022: मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने केला चन्नींचा पराभव, केजरीवालांनी दाखवली 'आम आदमी'ची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:38 IST2022-03-10T15:38:29+5:302022-03-10T15:38:49+5:30
Punjab Election Results 2022: पंबाजचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवत होते, पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे.

Punjab Election Results 2022: मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याने केला चन्नींचा पराभव, केजरीवालांनी दाखवली 'आम आदमी'ची ताकद
नवी दिल्ली: आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. पाचपैकी चार राज्यात भाजप बहुमताच्या दिशेने आहे, तर पंजाबमध्ये (Punjab Election Results 2022) आम आदमी पक्षाचे पहिल्यांदाच सरकार बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'आप'कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे. दरम्यान, आजचा विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
अरविंद केजरीवाल यांनी 'इंकलाब जिंदाबाद...'या घोषणेसह भाषणाची सुरुवात केली. 'स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सरकारने राज्याचा विकास केला नाही. प्रत्येकजण आपले खिसे भरण्यात व्यस्त होते. त्यांचा पक्ष मोठा आणि इतर पक्ष लहान असल्याने त्यांना खूप घमंड होता. पण, आम आदमी(सामान्य माणूस)ने त्यांचा घमंड मोडला', असे केजरीवाल म्हणाले.
'आम आदमी'ने केला चन्नींचा पराभव
दरम्यान, पंबाजचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवत होते, पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. याबद्दल बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, 'आपल्या पक्षाची ताकद काय आहे, हे चन्नींच्या पराभवावरुनच समजली. चन्नींचा पराभव कुणी मोठ्या नेत्याने नाही, तर एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या सामान्य व्यक्तीने केला.'
कोण आहेत लाभसिंग उगोके?
'पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव करणारे लाभसिंग उगोके हे एका मोबाईल फोन दुरुस्तीच्या दुकानात काम करतात, त्यांच्या आई सरकारी शाळेत सफाई कामगार आणि वडील शेतमजूर आहेत. ही आहे एका आम आदमीची खरी ताकद, असं केजरीवाल म्हणाले. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव करणाऱ्या महिला उमेदवार जीवन ज्योती कौर यादेखील एक कुटुंबातील आहेत, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.