पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पाणी व विजेची बिले माफ, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:38 PM2021-09-21T12:38:07+5:302021-09-21T12:39:38+5:30
शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली.
चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने लगेचच रविवारी मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव जाहीर केले आणि सोमवारी त्यांचा शपथविधीही पार पडला. त्यांच्याबरोबरच सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी या दोघांनाही राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी शपथ दिली. हे दोघे उपमुख्यमंत्री असतील.
शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत चन्नी यांनी शेतकऱ्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा करतानाच तिन्ही कृषी कायदे केंद्राने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू व निरीक्षक हरीश रावत होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लगेचच पावले टाकायला सुरुवात केल्याचे यातून दिसून आले. शपथविधीनंतर ते अतिशय हळवे झाले होते. केवळ काँग्रेसमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला हे पद मिळू शकले, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
चन्नी हे पंजाबचे पहिले दलित शीख मुख्यमंत्री असून, उपमुख्यमंत्री रंधावा हे जाट शीख, तर ओमप्रकाश सोनी हिंदू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी रंधावा यांचे नावही घेतले जात होते; पण आयत्या वेळी ते मागे पडले. मात्र, पक्षाचा निर्णय आपणास मान्य आहे, असे त्यांनी जाहीर केले.
३४ राखीव जागांवर डोळा, जातीच्या समीकरणांवर काँग्रेसचा भर -
पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्य़ांसमोर ठेवून काँग्रेसने पंजाबमधील शीख, दलित व हिंदू तिन्ही प्रमुख समुदायांना सत्तेतील मोठी पदे दिली आहेत. पंजाबमध्ये दलित लोकसंख्या ३२ टक्के असून, विधानसभेत ३४ जागा राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत राखीव ३४ पैकी काँग्रेसने २२ व आपने ९ जागांवर बाजी मारली होती. काँग्रेसने एकूण ११७ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या.
अकाली दलाने भाजपशी दोस्ती तोडल्यानंतर बहुजन समाज पार्टीशी युती करताना दलित नेत्यास उपमुख्यमंत्री करू, असे जाहीर केले आहे. ‘आप’नेही सत्तेत आल्यास दलित व्यक्तीस मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्याआधीच दलित नेत्यास मुख्यमंत्री करून, त्यांना शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. राज्यात दलित शिखांचे प्रमाण ३२, जाट शिखांचे प्रमाण १९ टक्के आणि हिंदूंचे प्रमाण ३८ टक्के आहे. बहुसंख्य दलित हे शीख असल्याने शिखांचे एकूण प्रमाण ५१ टक्के इतके भरते. हे सामाजिक व राजकीय गणित विचारात घेऊनच मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखिंदर सिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी यांनी निवड झाली आहे. अमरिंदर सिंग यांनी चन्नी यांचे अभिनंदन केले आहे.