पंजाब सरकार ड्रग्स तस्करांविरोधात अॅक्शन मोडमध्ये; अनिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:27 IST2025-03-06T12:18:31+5:302025-03-06T12:27:45+5:30
पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सरकारने मोठी कारवाई सुरु केली आहे.

पंजाब सरकार ड्रग्स तस्करांविरोधात अॅक्शन मोडमध्ये; अनिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर
Punjab Anti Drugs Operation:पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या पंजाब सरकारकडून ड्रग्ज माफियांविरोधात एकामागून एक कारवाई केली जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या आठवड्यात पंजाब राज्य अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानुसार प्रशासनाने ड्रग्ज तस्करांविरुद्ध कठोर पावलं उचलत बुलडोझर कारवाई सुरु केलीय. पंजाबमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून ५१० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून ४३ तस्करांना अटक करण्यात आली.
ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या कारवाईदरम्यान दोन दिवसांत ३३३ लोकांना पकडण्यात आले असून या प्रकरणांमध्ये राज्यभरात २७ गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी या तस्करांकडून ७७६ ग्रॅम हेरॉईन, १४ किलोग्राम अफू, ३८ किलोग्रॅम खसखस, २६१५ नशेच्या गोळ्या आणि ४.६० लाख रुपये रोख जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अमली पदार्थांविरुद्धच्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. विशेष पोलिस महासंचालक अर्पित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ३०० पोलीस पथकांनी राज्यभर छापे टाकत ६१९ संशयित व्यक्तींची चौकशी केली आहे.
ड्रग्ज तस्कराचा पोलिसांवर गोळीबार
तर वरिष्ठ पोलीस अधीक्षक भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फरीदकोट रोडवर कारवाई सुरू केली होती. कारवाईदरम्यान, बलजिंदर सिंग नावाच्या व्यक्तीला गाडी थांबवण्याचा इशारा दिला होता. पण त्याने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी बलजिंदरने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी फरीदकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी बलजिंदर सिंगकडून २.११ किलो हेरॉईन जप्त केले आहे.
ड्रग्ज तस्कराची मालमत्ता जमिनदोस्त
अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून पंजाब पोलिसांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह रविवारी जालंधरच्या फिल्लौरमध्ये तस्करी करणाऱ्याने बांधलेली मालमत्ता पाडली. ड्रग्ज तस्करांनी फिल्लौरमधील खानापूर आणि मंडी गावात पंचायतीच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे उभारण्यात आली होती. जालंधर (ग्रामीण) वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरकमल प्रीत सिंह खख यांनी सांगितले की, फिल्लौरच्या ब्लॉक विकास आणि पंचायत अधिकारी यांच्या विनंतीवरून अतिक्रमण हटवण्यात आलं.
अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली होती. ग्रामपंचायतीच्या जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याच्या आरोपावरून खानापूरचे रहिवासी जसवीर सिंग उर्फ शेरा आणि मंडी रहिवासी भोली यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. भोली हा कुख्यात अंमली पदार्थांचा तस्कर असून त्याच्यावर ड्रग्जशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्याच्याकडून २००५ मध्ये १.१९० किलो स्मॅकची जप्ती, २०१५ मध्ये दोन किलो अफूची जप्ती आणि २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवीर सिंगचे नावही अनेक प्रकरणांमध्ये आहे. 'चरस' आणि मादक इंजेक्शनच्या प्रकरणातही त्याचे नाव आलं होतं. महसूल आणि पंचायत अधिकाऱ्यांसह पोलिसांनी अतिक्रमण सुरळीतपणे पाडले आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन तस्कर अनेकदा गावकऱ्यांना धमकावत असत. संबंधित अधिकाऱ्यांनी ही जमीन ग्रामपंचायतीची असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्या जागेवर आरोपींचा अवैध व्यवसाय सुरु होता.