भारतातील हे राज्य अमली पदार्थांच्या तस्करांना देणार मृत्युदंड, केंद्राकडे पाठवला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 06:38 PM2018-07-02T18:38:03+5:302018-07-02T18:38:54+5:30
अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या भारतातील एका राज्याने या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
चंदीगड - अमली पदार्थांची तस्करी ही गेल्या काही काळात गंभीर समस्या बनली आहे. अनेक कडक उपाय योजना करूनही अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये घट झालेली दिसून येत नाही. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, आता केंद्राने मंजुरी दिल्यास राज्यातील अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Decided to recommend death penalty for drug peddling/smuggling. Recommendation being forwarded to Centre. Since drug peddling is destroying entire generations,it deserves exemplary punishment.I stand by my commitment for drug free Punjab: Capt.Amarinder Singh,Punjab CM (file pic) pic.twitter.com/POT60DuRpf
— ANI (@ANI) July 2, 2018
पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगड येथील सिव्हील सचिवालयात हा निर्णय घेण्यात आला. याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले की, "अमली पदार्थांच्या तस्करांनी राज्यातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पंजाब सरकार राज्याला व्यसनमुक्त करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे."
याआधी पंजाब सरकारने शस्त्रांच्या परवान्यासाठी अर्जदाराला डोप टेस्ट देणे अनिवार्य केले होते. सद्यस्थितीत पंजाबमध्ये अमली पदार्थांचे सेवन ही गंभीर समस्या बनली आहे. राज्यातील तरुण वर्गातील बहुतांश तरुण हे व्यसनाधीन झाले आहेत. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थांचा मुद्दा ऐरणीवर होता. तसेच राज्याला नशामुक्त करण्याचे वचन देऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता.