दिल्लीच्या 'त्या' आंदोलनातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार देणार 2 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 01:14 PM2021-11-13T13:14:19+5:302021-11-13T13:16:42+5:30
चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे.
नवी दिल्ली - पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्यावर्षी 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. या आंदोलनात पोलिसांनी एकूण 83 समर्थकांना अटक केली होती. आता, या 83 जणांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे. आम्ही 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 83 आंदोलनकर्त्यांना पंजाब सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत करण्यात येईल.
Reiterating My Govt’s stand to support the ongoing #FarmersProtest against three black farm laws, We have decided to give Rs 2 lakh compensation to 83 people arrested by Delhi Police for carrying out a tractor rally in the national capital on 26th January, 2021.
— Charanjit S Channi (@CHARANJITCHANNI) November 12, 2021
26 जानेवारी 2021 रोजी केंद्र सरकारच्या 3 शेती कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाद्वारे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या ट्रॅक्टर रॅलीला त्यावेळी हिंसक वळण लागले होते, तेव्हा आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडून सुरक्षा रक्षकांवर हल्लाबोल करत लाल किल्ल्यावर किसान मोर्चा आंदोलनाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, लाल किल्ला परिसरात शेतकरी आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांमध्ये खडाजंगी झाली, पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 200 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी, 83 शेतकरी आंदोलकांनी ही मदत देण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकराच्या 3 कृषी कायद्यांविरुद्धच्या शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्वीनिमित्त 29 नोव्हेंबरपासून संसद परिसरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात 26 नोव्हेंबरपासून संयुक्त किसान मोर्चाने आंदोनलास सुरुवात केली होती.