उधारीच्या पैशाने काढली लॉटरी अन् कामगार झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 11:10 AM2018-09-06T11:10:19+5:302018-09-06T11:25:00+5:30
पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच एक घटना घडली आहे.
चंदिगड - रातोरात करोडपती झालेल्या लोकांच्या अनेक रंजक गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच एक घटना घडली आहे. लॉटरीच्या तिकीटाने एका कामगाराला रातोरात करोडपती केले आहे. विशेष म्हणजे उधारीच्या पैशातून कामगाराला ही कोटींची लॉटरी लागली आहे.
मनोज कुमार असं या कामगाराचं नाव असून मनोजला 1.5 कोटींची लॉटरी लागली आहे. लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे मनोजने 200 रुपये उधार घेतले होते. पंजाब राज्य राखी बंपर 2018 या लॉटरी स्पर्धेसाठी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यामध्येच मनोजला पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं आहे. त्यानंतर लॉटरीचं तिकीट घेऊन त्याने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना तिकीट दाखवलं. अधिकाऱ्यांनीही मनोजला लॉटरीची रक्कम लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं.
29 ऑगस्ट रोजी या लॉटरीच्या लकी ड्रॉ ची घोषणा झाली होती. यामध्ये 1.5 कोटींचे बक्षिस हे लॉटरी जिंकलेल्या लोकांना देण्यात येणार होतं. मनोजही या लॉटरी स्पर्धेत सहभागी झाला. मोठ्या रक्कमेची लॉटरी लागेल याचा विचार त्याने कधीच केला नव्हता मात्र आता बक्षिस मिळाल्यामुळे तो रातोरात करोडपती झाला आहे.