सुफी गायक विरुद्ध अभिनेत्यामध्ये सामना, हंस राज हंस आणि करमजीत अनमोल रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:54 AM2024-04-04T10:54:28+5:302024-04-04T10:58:01+5:30
Punjab Lok Sabha Election 2024: पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता, असा सामना रंगणार आहे. भाजपने प्रख्यात सुफी गायक हंस राज हंस यांना तर आपने पंजाबी अभिनेता करमजीत अनमोल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
चंडीगड - पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता, असा सामना रंगणार आहे. भाजपने प्रख्यात सुफी गायक हंस राज हंस यांना तर आपने पंजाबी अभिनेता करमजीत अनमोल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हंस राज हंस हे उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. पंजाबमध्ये येत्या १ जून रोजी १३ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.
सध्या फरीदकोट लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद सादिक हे खासदार आहेत. तेही पंजाबी लोकगायक आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. हंस राज हंस हे गेल्या १५ वर्षांपासून राजकारणात आहेत. ते उत्तर-पश्चिम दिल्लीचे खासदार असले तरी आता फरीदकोटमधून आपले नशीब अजमावणार आहेत. करमजीत अनमोल हा मला धाकट्या भावासारखे आहेत. ते जेव्हा भेटतात तेव्हा अतिशय आदराने माझ्याशी वागतात, असे हंस राज हंस यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार मोहम्मद सादिक हे मला पित्यासमान आहेत.
हंस राज हंस यांनी सांगितले की, उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात मी जे काम केले व फरीदकोट येथे भविष्यात जे काम करणार आहे, त्याबद्दल प्रचारादरम्यान बोलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायासाठी खूप उत्तम कार्य केले आहे. कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला, हे त्यातील एक महत्त्वाचे काम आहे.
तीन वेळा केले पक्षांतर
हंस राज हंस यांनी शिरोमणी अकाली दलाच्या माध्यमातून २००९ साली राजकारणात प्रवेश केला.
त्यावेळी ते जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र, त्यांना हार पत्करावी लागली होती.
त्यांनी २०१४ साली शिरोमणी अकाली दलाला सोडचिठ्ठी दिली.
त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसमध्ये गेले.
त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षांतर केले व ते भाजपमध्ये दाखल झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ते भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले.