पंजाब मेलला आग लागल्याची अफवा; चेंगराचेंगरीत २० प्रवासी जखमी, ७ जणांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 03:52 PM2024-08-11T15:52:48+5:302024-08-11T16:00:55+5:30
पंजाब मेल एक्स्प्रेसमध्ये रविवारी सकाळी अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब मेल एक्स्प्रेसमध्ये रविवारी सकाळी अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बरेली आणि कटरा स्थानकादरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये अचानक आग लागल्याची अफवा पसरली, त्यामुळे अनेक प्रवाशांनी घाबरून चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या.
लोक चालत्या ट्रेनमधून अचानक उड्या मारू लागले. घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी शहाजहानपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. अमृतसरहून हावडाकडे जाणाऱ्या पंजाब मेल एक्स्प्रेस क्रमांक १३००६ मध्ये ही घटना घडली. आगीच्या अफवेने चेंगराचेंगरी झाली आणि लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्याचं सांगितलं आहे.
#शाहजहांपुर के पंजाब मेल में आग की अफवाह से मची भगदड़ चलती ट्रेन से कूदे यात्री, कई यात्री घायल होने की खबर ट्रेन नंबर 13006 अमृतसर से हावड़ा जाने वाली ट्रेन की घटन 4 लोग घायल।@bharatupdate_@ind24official@TV27_Newspic.twitter.com/unzajE60ag
— संजीव कुमार (@Sanjeev15592594) August 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १३००६ पंजाब मेल एक्सप्रेस अमृतसरहून हावडाकडे जात होती. ती सकाळी साडेआठच्या सुमारास बिलपूर कटरा स्टेशनवर पोहोचली. जनरल डब्यात धुराचे लोट पाहून लोकांना वाटलं की बोगीला आग लागली आहे. अशा स्थितीत सर्व प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारून पळ काढला. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आणखी एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, सीझफायर सिलिंडर लीक झाल्यामुळे धूर निघाला होता, पण लोकांना तो आगीचा धूर वाटत होता.
चेंगराचेंगरीच्या या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेने जीआरपीसह रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. बोगी रिकामी झाल्यानंतर ट्रेन थांबवून तपासणी केली असता सर्व काही ठीक असल्याचं दिसून आलं. यानंतर जखमींना शाहजहांपूरला नेण्यात आले आणि तेथून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.