अबुधाबीहून लग्नासाठी सुट्टी घेऊन आला अन् प्लान रद्द करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाला
By कुणाल गवाणकर | Published: December 26, 2020 11:14 AM2020-12-26T11:14:48+5:302020-12-26T11:17:06+5:30
यूएईहून दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आलेला तरुण शेतकरी आंदोलनात सहभागी
दिल्ली: मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवरील भागांत गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूएईहून आलेला एक तरुणदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे हा तरुण लग्न करण्यासाठी दोन महिन्यांची सुट्टी काढून पंजाबमध्ये दाखल झाला. मात्र मोठा भाऊ आणि गावातील बरेचसे शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जात असल्यानं पाहून त्यानंदेखील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
पंजाबला जाऊन मुलगी शोधायची आणि लग्न करायचं या उद्देशानं २९ वर्षी सतनाम सिंगनं अबुधाबी सोडली. जवळपास दोन वर्षे सलग काम केल्यानंतर सतनामला दोन महिन्यांची रजा मिळाली. त्यानंतर तो २९ नोव्हेंबरला जालंधरला पोहोचला. त्यावेळी मोठा भाऊ आणि गावातील शेतकरी सिंघू सीमेवर सरकारविरुद्ध आंदोलन करत असल्याचं त्याला समजलं. सतनाम दोन दिवस आई बाबांसोबत राहिला. त्यानंतर त्यानं दुचाकीवरून एका मित्रासोबत दिल्ली-हरयाणाची सीमा गाठली.
लग्न नंतर होऊ शकतं. नोकरी नंतर करता येऊ शकते, असं अबुधाबीत प्लंबर म्हणून काम करणाऱ्या सतनामनं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं. सतनामनं या सुट्टीत लग्न करावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. मात्र सतनाम सध्या आंदोलनात सहभागी झाला आहे. 'मी सुट्टीत लग्न करावं. माझा संसार सुरू व्हावा, अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. माझी आई आता ७० वर्षांची आहे. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. तिला नीटसं दिसत नाही. वडिलांचं वयदेखील जास्त असल्यानं त्यांना शेतातील सर्व कामं जमत नाही,' अशा शब्दांत सतनामनं घरातील परिस्थिती सांगितली.
सतनामचे पालक घरी आहेत. त्यांना सोडून सतनाम आंदोलनासाठी सिंघू सीमेवर आला आहे. मात्र त्यांनी सतनामला रोखलं नाही, असं सतनामचा मित्र सुखा सिंहनं सांगितलं. अजून किती दिवस आंदोलन करणार, असा प्रश्न विचारला असता, जोपर्यंत लढा जिंकत नाही तोपर्यंत, असं उत्तर सतनामनं दिलं. 'मी आधी शेतकरी आहे. सुरुवातीला शेतातच काम करायचो. त्यानंतर नोकरीसाठी यूएईला गेलो. मला आधी माझं शेत वाचवायचं आहे,' असं सतनाम म्हणाला.