PNB Scam : लंडनमध्ये लपलेल्या नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:32 AM2018-08-23T11:32:49+5:302018-08-23T12:27:03+5:30
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी ईडीनं आवश्यक ती सर्व कागदपत्रं लंडन प्रशासनाकडे पाठवली आहेत. या कागदपत्रांची लंडन प्रशासनानं खातरजमादेखील केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतून लेटर आॅफ अंडरटेकिंगद्वारे घेतलेले 11,500 कोटी रुपयांचे कर्ज थकीत ठेवून नीरव मोदीनं परदेशात पोबारा केला आहे.
नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याच्या वृत्तास ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच त्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयने योग्य माध्यमातून विनंती केली आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
(नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार)
'डायमंड किंग' अशी नीरव मोदीची ओळख आहे. फोर्ब्जच्या या जगातील श्रीमंतांच्या यादीत मोदी 84 व्या स्थानी होता. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागताच तो भारताबाहेर पसार झाला होता. तेव्हापासून भारतीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहे.
कोण आहे नीरव मोदी -
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 47 वर्षीय नीरवचे वडीलदेखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
काय आहे प्रकरण -
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली होती.