‘पंजाब नॅशनल बँके’त पुन्हा घोटाळा; सीबीआयकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:41 AM2019-12-29T01:41:04+5:302019-12-29T06:31:04+5:30
२०१८ पासून बँकेच्या वतीने सीबीआयकडे तिसरी तक्रार दाखल झाली असून, त्यात आपल्याला सुमारे २ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे बँकेने म्हटले आहे.
नवी दिल्ली : नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी केलेल्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. २०१८ पासून बँकेच्या वतीने सीबीआयकडे तिसरी तक्रार दाखल झाली असून, त्यात आपल्याला सुमारे २ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे बँकेने म्हटले आहे.
पीएनबीने ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सीबीआयच्या वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. या तक्रारीनुसार, वाहन दुरुस्ती आणि सेवा क्षेत्रातील कंपनी ‘कार्नेशन ऑटो इंडिया प्रा.लि.’चे संस्थापक जगदीश खट्टर यांनी बँकेला ११० कोटी रुपयांना (१५.४ दशलक्ष डॉलर) फसविले आहे. कुकर्जाशी संघर्ष करणाऱ्या पीएनबीने जुलैमधील बनावट व्यवहाराचीही तक्रार केली आहे. ताज्या तक्रारीत बँकेने म्हटले आहे की, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या खट्टर यांनी काही बँकांशी हातमिळवणी करून पंजाब नॅशनल बँकेला फसवले. दरम्यान, खट्टर यांनी फसवणुकीचा आरोप फेटाळून लावला आहे. कार्नेशन कंपनी व्यवसायात अपयशी ठरली आहे. हे शुद्ध व्यावसायिक अपयश आहे. त्यात काहीही चुकीचे घडलेले नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला आघाडीच्या मान्यवर संस्थेकडून विस्तृत न्यायसहायक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात काहीही चुकीचे आढळून आलेले नाही. सीबीआयने छापे मारून चौकशीही केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आमच्या म्हणण्यास दुजोरा मिळेल.
पीएनबीच्या तक्रारीनुसार, बँकेने ३० जून २०१२ रोजी कार्नेशनचे खाते कुकर्जाच्या श्रेणीत टाकले होते. दरम्यान, पीएनबीच्या कुकर्जाचे प्रमाण सप्टेंबरमध्ये १६.८ टक्के झाले आहे. जूनमध्ये ते १६.५ टक्के होते.