लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलीस घेऊ शकतात ताब्यात; नीरज बवाना गँगचाही बदला घेण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:10 AM2022-06-01T11:10:49+5:302022-06-01T11:11:48+5:30
Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला चौकशीसाठी पंजाबमध्ये आणले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने मुसेवाला हत्याकांडप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतल्यानंतर, पंजाब पोलिसांनीही या प्रकरणात कागदोपत्री कार्यवाही सुरू केली आहे, जेणेकरून बिश्नोईला ट्रान्झिट रिमांडवर पंजाबमध्ये आणता येईल.
दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्यावतीने सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, त्याने विक्की मिड्डूखेडा याच्या हत्येचा बदला घेतला आहे. तसेच, कॅनडात लपून बसलेला आणि लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गँगस्टर ब्रार यानेही सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, आता सिद्धू मूसेवाला हत्येनंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा गँगवार सुरू होऊ शकते. विकी डोंगर आणि बंबिहा गँगनंतर आता नीरज बवाना गँगही कथित सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मैदानात उतरली आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित या अकाऊंटवरुन सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नीरज बवाना गँगने फेसबुक पोस्टमध्ये सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा निषेध केला आणि दोन दिवसांत निकाल देऊ, अशी उघड धमकी दिली आहे. मात्र, ही पोस्ट कोणी लिहिली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या पोस्टरमध्ये नीरज बवानाला टॅग करण्यात आले आहे. नीरज बवानावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे. पण, त्याच्या गँगचे सदस्य दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये आहेत. नीरज बवानाच्या गँगमधील काही मुले त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स हाताळतात, त्याच्या गँगच्या नावाने फेसबुकवर डझनभर पेजेस आहेत आणि लाखो फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सिद्धू मुसेवाला यांची अंत्ययात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टर ५९११ मध्ये काढण्यात आली. अनेक पंजाबी गाण्यांमध्ये त्यांनी या ट्रॅक्टरचा उल्लेख केला होता. अंत्यसंस्कारानंतर मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरणकौर यांनी उपस्थित लोकांना हात जोडून त्यांचे आभार मानले. भावुक झालेल्या वडिलांनी डोक्यावरील पगडी काढून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित लोकांनी 'पंजाब सरकार मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. मुसेवाला यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल लोकांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
अर्ध्यावरती डाव मोडला...
सिद्धू मुसेवाला हे सध्या लग्नाच्या तयारीत होते. जूनमध्ये लग्न होते. संगरुर जिल्ह्यातील संघरेडी गावातील अमनदीप कौर यांच्याशी त्यांचा विवाह होणार होता. सध्या त्या कॅनडात राहतात व तेथील स्थायी नागरिक आहेत. अमनदीप आणि सिद्धू मुसेवाला यांचा विवाह दोन वर्षांपूर्वीच ठरला होता. अमनदीप कौर या अकाली दलाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या भाची आहेत. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून विधानसभा निवडणूक लढविल्याने विवाह पुढे ढकलला होता.