Punjab Politics : हरभजन सिंग राजकीय मैदानात उतरणार? आप भज्जीला मोठं पद देत महत्त्वाची जबाबदारी सोपवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:05 PM2022-03-16T22:05:42+5:302022-03-16T22:06:24+5:30
Punjab Politics: एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे.
चंदिगड - नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. पंजाबमध्ये आलेल्या आपच्या लाटेत सत्ताधारी काँग्रेससह, अकाली आणि भाजपा हे पक्षही झाडून साफ झाले होते. त्यानंतर आज आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.
एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्ष भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या राजकीय प्रवेशासाठी पायघड्या पसरत आहे. आम आदमी पक्षाने हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी केल्याचे वृत्त आहे. तसेच त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आपच्या लाटेसमोर पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्ष पुरता गारद झाला होता. तसेच आता पंजाब आणि दिल्ली अशा दोन राज्यांत आपची सत्ता स्थापन झाली असून, आता आपला राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.