पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:35 AM2022-02-21T05:35:11+5:302022-02-21T05:35:38+5:30

अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद

Punjab polled 68 per cent and Uttar Pradesh polled 60 per cent in the third phase | पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान

पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान

Next

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी काही तुरळक प्रसंग वगळता रविवारी शांततेने मतदान पार पडले. पंजाबमध्ये ६८ टक्के व उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अशा अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.

पंजाबमध्ये निवडणूक रिंगणात १३०४ उमेदवार होते. या राज्यात अंतर्गत वादांमुळे त्रासलेल्या काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आप, शिरोमणी अकाली दल, भाजप, पंजाब लोक काँग्रेस आदी पक्षांनी कंबर कसली होती. पंजाब, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होईल. उत्तर प्रदेशमध्ये आता ७ मार्चपर्यंत विधानसभा निवडणुकीचे आणखी चार टप्पे पार पडणार आहेत.

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी सुमारे ६० टक्के मतदान झाले. सपचे प्रमुख अखिलेश यादव लढत असलेल्या करहाल मतदारसंघातील घडामोडींकडे रविवारी सर्वांचे लक्ष लागले होते. 
  • झाशी येथील बबीना विधानसभा मतदारसंघातील सिमथरी गावात सप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. त्यात काही जण जखमी झाले. असे आणखी एक-दोन प्रकार वगळता उत्तर प्रदेशातील मतदान शांततेत पार पडले.

भाजप-अकाली दलाची निकालानंतर युती?
निकालानंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी गरज पडल्यास भाजप आघाडीसोबत शिरोमणी अकाली दल समझोता करू शकतो, असे विधान करुन बिक्रम सिंग मजिठिया यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याचे संकेत दिले. त्यावरून १० मार्चला लागणाऱ्या निवडणूक निकालानंतर राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता दिसते. मजिठिया हे शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते आहेत.

सोनू सूद यांची कार जप्त
पंजाबमधील मोगा शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन अभिनेता सोनू सूद मतदारांना प्रभावित करीत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांनी मतदान केंद्रांना भेट देऊ नये, घरातच राहावे असा आदेश निवडणूक आयोगाने त्यांना दिला. पोलिसांनी अभिनेता सोनू सूद यांची कार जप्त करून पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. सूद यांची बहीण मालविका सूद सच्चर या मोगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

Web Title: Punjab polled 68 per cent and Uttar Pradesh polled 60 per cent in the third phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.