Navjot Singh Sidhu: सिद्धूंचा मोठा पराभव होणार; अमरिंदर सिंगांनी सांगितले मतदार संघाचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 10:33 AM2022-02-01T10:33:56+5:302022-02-01T10:34:48+5:30
Navjot Singh Sidhu Defeat: सिद्धूंविरोधात अकाली दलाच्या बिक्रम सिंग मजीठिया यांना उतरविण्यास आपला हात असल्याचे वृत्त हास्यास्पद आहे. मी काही मजीठियाचा काका नाहीय, असे कॅप्टन म्हणाले.
पटियाला : पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत मोठी भविष्यावाणी केली आहे. सिद्धू यांना लाजिरवाना पराभव पत्करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून आमदारकीला उभे राहिले आहेत. सिद्धू यांनी या मतदारसंघातून भाजपाच्या समर्थनामुळे विजय मिळविला होता, असा दावा अमरिंदर यांनी केला आहे. याचबरोबर माहिती गोळा करूनच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित केला जाईल या राहुल गांधी यांच्या घोषणेला एक ढोंग असल्याचे कॅप्टननी म्हटले आहे.
सिद्धूंविरोधात अकाली दलाच्या बिक्रम सिंग मजीठिया यांना उतरविण्यास आपला हात असल्याचे वृत्त हास्यास्पद आहे. मी काही मजीठियाचा काका नाहीय. अमृतसर पूर्वेला ३८ टक्के मतदार हिंदू आणि ३२ टक्के मतदार अनुसुचित जातीचे आहेत. यामुळे सिद्धू यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा कॅप्टन यांनी केला आहे. भाजपाने पीएलसी आणि अकाली दल संयुक्त यांच्या आघाडीतून या मतदारसंघातून एक ताकदवर उमेदवार उभा केला आहे, असेही ते म्हणाले.
पंजाबमध्ये तीन पक्ष एकत्र लढत असून आपल्यात आघाडीची सरकार बनेल असा दावा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे. काही पीएलसी उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास लावली आहे. यामागे मतदारांचे गणित लक्षात घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले. भाजपा ६५, पीएलसी ३७ आणि अकाली दल संयुक्त १५ जागांवर निवडणूक लढवत आहे.