पंजाब : दिवसाढवळ्या महिलेचे ऑफीसमधून अपहरण करून अज्ञातस्थळी केला बलात्कार
By admin | Published: April 23, 2016 11:37 AM2016-04-23T11:37:57+5:302016-04-23T11:39:45+5:30
पंजाबच्या मुक्तसर येथे दिवसाढवळ्या एका महिलेचे ऑफीसमधून अपहरण करून तिच्यावर निर्जनस्थळी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुक्तसर (पंजाब), दि. २३ - देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पंजाबच्या मुक्तसर येथे दिवसाढवळ्या एका महिलेचे ऑफीसमधून अपहरण करून तिच्यावर निर्जनस्थळी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला शनिवारी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण आणि बलात्काराची ही धक्कादायक घटना २५ मार्च रोजी घडली. २४ वर्षीय पीडित तरूणीला आरोपींनी तिच्या ऑफीसमधून बळजबरीने बाहेर खेचन नेले, त्यानंतर एका कारमध्ये बसवून ते तिला एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र तब्बल एका महिन्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.
ही पीडित तरूणी जेथे काम करत होती, तेथेच असलेल्या शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली असून शुक्रवारी ते फूटेज समोर आले आहे. या फूटेजमध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला इसम त्या तरूणीला जबरदस्तीने ओढून घेऊन जाताना दिसत असून ती तरूणी मदतीसाठी हाका मारतानाही दिसत आहे. मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही.
दरम्यान या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी त्या आरोपीची ओळख पटवून एकाला अटक केली आहे. हा आरोपी व पीडित महिला एकाच गावचे रहिवासी असून तो आरोपी त्या महिलेला ओळखतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.