Video - मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फ्री लंचसाठी शिक्षकांमध्ये तुफान राडा; प्लेटसाठी धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:26 PM2022-05-13T12:26:34+5:302022-05-13T12:28:11+5:30
Video - बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्सवर अक्षरश: तुटून पडले. प्लेटसाठी अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले.
नवी दिल्ली - लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही समारंभात खाण्यासाठी कधी कधी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोटधरून हसाल. जेवणासाठी लोक भांडताना दिसत आहेत. पंजाबमधील एका आलिशान रिसॉर्टमधला हा व्हिडीओ आहे, जिथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी सरकारी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी शिक्षणातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधला. या चर्चेनंतरचाच हा व्हिडीओ आहे.
शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्सवर अक्षरश: तुटून पडले. प्लेटसाठी अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, जो रिसॉर्टचा कर्मचारी असावा, त्याने घाईघाईने प्लेट्स एका कोपऱ्यात नेल्या आणि शिक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून एक एक वाटू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
Lunch time of Principals and Teachers in Punjab after meeting CM. Time to go to HEYWARD. CM might have gone home with some HEYWARDS. pic.twitter.com/bDwF1HooCm
— Abhijit Guha (@Abhijit33886372) May 11, 2022
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अभिजीत गुहा नावाने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिले की, प्रत्येकाला कोंबडा बनवा. दुसर्या यूजरने लिहिले की, मी हे समजण्यास उत्सुक आहे की दुपारचे जेवण किती वाजता दिले गेले, कारण त्यांना खूप भूक लागली आहे. शिक्षकांना बैठकीच्या ठिकाणी आणण्यासाठी पंजाब सरकारने एसी बसेसचीही व्यवस्था केली होती. राज्याचे शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षकांच्या सूचना ऐकण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.