पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे मोठे षडयंत्र!, ISI ने बनवला 'लष्कर-ए-खालसा' नावानं नवा गट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:22 PM2022-05-10T16:22:48+5:302022-05-10T16:23:20+5:30
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यासाठी नव्या नावानं एक संघटना स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली-
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यासाठी नव्या नावानं एक संघटना स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या नव्या दहशतवादी संघटनेचं नाव 'लष्कर-ए-खालसा' असं ठेवण्यात आलं आहे.
नव्या दहशतवादी गटात सामील होणाऱ्या दहशतवाद्यांना खास अफगाण दहशतवाद्यांकडून ट्रेनिंग दिलं जात आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनाही लष्कर-ए-खालसामध्ये समाविष्ट करण्यात आलं हे. अफगाणी दहशतवाद्यांना आरपीजीसह अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र चालवण्याचा अनुभव असतो. समोर आलेल्या माहितीनुसार या गटाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्येही हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे लष्कर-ए-खालसामध्ये पंजाब आणि हरियाणातील स्थानिक गँगस्टर आणि गुन्हेगारांना सामीन करुन घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. यात ड्रग्जच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचं लालूच देऊन त्यांना संघटनेत सामील करुन घेतलं जात आहे.
मोहालीच्या इंटेलिजन्स इमारतीत स्फोट
पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी रात्री पोलीस इंटेलिजन्स हेडक्वार्टरच्या इमारतीत एक स्फोट झाला. या घटनेसंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एका कारमधून दोन संशयित लोक आले आणि त्यांनी जवळपास ८० मीटर दूरवरुन रॉकेटच्या सहाय्यानं ग्रेनेड इमारतीवर डागले होते.
या स्फोटानंतर पंजाबमध्ये हायअलर्ट घोषीत करण्यात आला आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच इंटेलिजन्स ब्युरोच्या दिशेने येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. दरम्यान पंजाब पोलिसांनी या घटनेला अद्याप दहशतवादी हल्ला असल्याचा दुजोरा दिलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा स्फोट खूप कमी तीव्रतेचा होता.