Election Dates : युपी, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:10 PM2022-01-08T12:10:55+5:302022-01-08T12:11:25+5:30
UP, Pujab 5 States Elections : दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग देणार माहिती
UP, Pujab 5 States Elections : देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल लवकरच वाजणार आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल याचं चित्र स्पष्ट होईल. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे, ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत, अशाही परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका घेण्यावर ठाम आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. याचं कारण उत्तर प्रदेशातील कल लोकसभा निवडणुकांचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट करू शकतो, असं म्हटलं जातं.
५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.
Election Commission of India to announce the schedule for Assembly elections to Goa, Punjab, Manipur, Uttarakhand and Uttar Pradesh at 3.30pm today pic.twitter.com/FxHRHTmHFj
— ANI (@ANI) January 8, 2022
किती टप्प्यात असू शकते निवडणूक?
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात मतदान होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे. तर पंजाबमध्येही विधानसभा निवडणूक होत असून, त्या तीन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. तर, मणिपूर विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकतात. तर गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडू शकतील, असं म्हटलं जातंय.