पंजाबमध्ये 424 लोकांना पुन्हा VIP सुरक्षा मिळणार; कोर्टाने भगवंत मान सरकारला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:45 PM2022-06-02T16:45:31+5:302022-06-02T16:48:05+5:30
punjab vip security : पंजाबच्या भगवंत मान सरकारने पुन्हा 424 लोकांची सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
चंदीगड : पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांची सुरक्षा हटविण्याचा हा मोठा मुद्दा बनला आहे. त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने 424 लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. मात्र आता पंजाब सरकारला न्यायालयाने फटकारले आहे. तसेच, सुरक्षा काढण्याची लिस्ट लीक झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंजाबच्या भगवंत मान सरकारने पुन्हा 424 लोकांची सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. 7 जूनपासून या सर्वांची सुरक्षा पुन्हा सुरळीत होणार आहे. दरम्यान, एका मर्यादित कालावधीसाठी त्या व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती, यावर सरकारने भर दिला. मात्र, एखाद्याची सुरक्षा हटवायची असली तरी परिस्थितीचा योग्य आढावा घ्यावा, सर्व पैलूंवर विचारमंथन व्हायला हवे, तरच तसा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने जवळपास 424 व्हीआयपी लोकांची सुरक्षा हटविण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या 424 व्हीआयपी लोकांमध्ये राजकीय मंडळी, निवृत्त अधिकारी तसेच सध्या कार्यरत पोलीस कर्मचारी आणि धर्मगुरूंचा सामावेश होता. पंजाब सरकारने राज्यातील व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी एप्रिलमध्येही पंजाब सरकारने 184 लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग, काँग्रेस आमदार प्रताप सिंह आणि बाकीच्या नेत्यांचाही समावेश होता.