पंजाबी गायक परमिश वर्मावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 12:42 PM2018-04-14T12:42:12+5:302018-04-14T12:42:12+5:30
पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमिश वर्मा याच्यावर शनिवारी पहाटे दीड वाजता गोळ्या झाडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोहाली- पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमिश वर्मा याच्यावर शनिवारी पहाटे दीड वाजता गोळ्या झाडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मोहालीच्या सेक्टर 91मध्ये झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
परमिश वर्मा हा 'गल नहीं कधनाई' या गाण्यामुळे पंजाबमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. पोलीस अधीक्षक कुलदीप चहल यांनी दिलेल्या निवेदनामध्ये, '' काही अज्ञात लोकांनी काल रात्री 1.30 च्या सुमारास परमिश घरी परतत असताना मोहालीच्या सेक्टर 91मध्ये त्यावर गोळ्या झाडल्या, त्याच्या पायाला गोळी लागली आहे'' असे स्पष्ट केले आहे.
या घटनेवेळी परमिशबरोबर त्याचा मित्रही होता. पोलिसांनी वर्माची प्रकृती सुधारत असून तो त्याला आता धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात गुन्हा नोंद झाला असून तपास सुरु करण्यात आला आहे. गल नहीं कधनाई या त्याच्या गाण्याला पंजाबी श्रोत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. या गाण्याला यूट्यूबवर 1.18 कोटी लोकांनी ते पाहिलेले आहे. परमिश शर्मावर हल्ला करणाऱ्या लोकांचा अद्याप तपास सुरु असला तरीही दिलप्रित सिंग धहन या व्यक्तीने त्याची जबाबदारी घेतली आहे. त्याने आपल्या फेसबूकवर शर्माविरोधात मजकूर टाकला असून शर्माच्या छायाचित्रावर फुली आणि स्वतःच्या हातात पिस्तूल असं एकत्र छायाचित्र त्याने प्रसिद्ध केलं आहे. '' मी दिलप्रित सिंग धहन परमिशवर हल्ला मी केला हे तुम्हाला सांगायचं आहे'' असं त्यानं तेथिल मजकुरात स्पष्ट केलं आहे.