महात्मा गांधींचे नाव पुसून टाका -रॉय
By admin | Published: July 18, 2014 11:07 PM2014-07-18T23:07:24+5:302014-07-18T23:07:24+5:30
महात्मा गांधी जातीयवादी असल्याची टीका करणाऱ्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी आता गांधींचे नाव असणाऱ्या संस्थांची नावे बदलली
तिरुवनंतपुरम : महात्मा गांधी जातीयवादी असल्याची टीका करणाऱ्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी आता गांधींचे नाव असणाऱ्या संस्थांची नावे बदलली पाहिजेत, अशी टोकाची भूमिका घेतली आहे.
केरळ विद्यापीठात आयोजित महात्मा अय्यंकाली स्मृती व्याख्यानमालेत रॉय बोलत होत्या. अय्यंकाली यांच्या दलित शिक्षणातील योगदानाबद्दल बोलताना अरुंधती राय यांनी महात्मा गांधी यांच्यावर सडकून टीका केली. गांधीजी हे जातीयवादी होते. त्यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या एका लेखात विष्ठा साफ करणाऱ्यांना मानवी विष्ठापासून खत बनविण्याचा सल्ला दिला होता. वर्णव्यवस्था शाबूत राहावी यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले होते, असा आरोप रॉय यांनी केला. अय्यंकाली यांचे कार्य अभिमानास्पद आहे. रशियन क्रांतीच्या खूप आधी त्यांनी कामगारांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. अशा महात्मा अय्यंकाली यांचे नाव आपल्या विद्यापीठांना द्यायचे की गांधीजींचे, याचा विचार करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. सेंटर फॉर गांधीयन स्टडीजचे संयोजक जे. एम. रहिम यांनी हा आरोप फेटाळला. (वृत्तसंस्था)