कौतुकास्पद! दीड कोटी खर्च करून बँकेचा मॅनेजर बांधतोय वृद्धाश्रम; 'अशी' मिळाली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 04:36 PM2024-02-21T16:36:06+5:302024-02-21T16:48:28+5:30
1.50 कोटी रुपये खर्चून एक अप्रतिम वृद्धाश्रम बांधत आहेत. सध्या ते सेंट्रल बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पगार आणि कर्ज घेऊन ते हे वृद्धाश्रम बांधत आहेत.
प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो पण जो इतरांसाठी जगतो तो महान असतो असं म्हणतात. बिहारच्या पूर्णिया येथील श्याम कमल चौधरी यांनी देखील लोकांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं आहे. वृद्धाश्रम बांधण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यात ते आता यशस्वी झाले आहे. श्याम कमल चौधरी 1.50 कोटी रुपये खर्चून एक अप्रतिम वृद्धाश्रम बांधत आहेत. सध्या ते सेंट्रल बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पगार आणि कर्ज घेऊन ते हे वृद्धाश्रम बांधत आहेत.
श्याम कमल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 1.50 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन वृद्धाश्रम बांधण्याचं काम सुरू केलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत त्यांनी एकट्यानेच हा प्रवास केला आहे. मात्र आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका बँकेत मॅनेजर आहेत, या काळात अनेक वृद्ध स्त्री-पुरुष पेन्शन घेण्यासाठी येतात. जेव्हा मी त्यांच्या समस्या ऐकतो तेव्हा मला वाईट वाटतं. या सर्व समस्या पाहून माझ्या मनात ही संकल्पना आली. या वृद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील. त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली जाईल, मग ती वैद्यकीय सुविधा असो, किचन, वॉकिंग सेंटर आणि इतर व्यवस्था असो.
तीन मजल्याची ही इमारत बांधली जात आहे. पहिला मजला वृद्ध पुरुषांसाठी, दुसरा मजला महिलांसाठी आणि तिसरा मजला वृद्ध जोडप्यांसाठी असेल. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करायला सुरुवात केल्यापासूनच वृद्धाश्रम बांधण्याचा विचार त्यांच्या मनात आला, असं ते म्हणाले. मात्र, आतापर्यंत विविध राज्यांत व जिल्ह्यांत दीर्घकाळ बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2019 मध्ये वृद्धाश्रम निर्माण करण्याची कल्पना त्यांनी सुरू केली होती, पण कोरोनाच्या काळात थोडा विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं काम 2021 पासून जोरात सुरू आहे. 300 लोकांची क्षमता आहे. येथे 300 लोक आरामात राहू शकतील. पर्यावरणाची विशेष काळजी घेऊन निर्मिती करण्यात आली आहे. लोकांच्या सहकार्याने हे वृद्धाश्रम बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.