भाजपाला जबर धक्का ?
By admin | Published: June 11, 2016 06:33 AM2016-06-11T06:33:18+5:302016-06-11T06:33:18+5:30
विविध पक्षांत बंडखोरी घडवून आणण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याचे संकेत असून, आज ११ जून रोजी मतदान आणि निकाल घोषित होणार
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत पाच राज्यांमध्ये पाच जागांवर अपक्षांना पाठिंबा देत विविध पक्षांत बंडखोरी घडवून आणण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याचे संकेत असून, आज ११ जून रोजी मतदान आणि निकाल घोषित होणार आहे.
हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड या पाच राज्यांमध्ये अपक्षांना भाजपाने पाठिंबा जाहीर केला असले तरी हे उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी आहे. या राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा हादरा देण्यासाठी बहुतांश विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकले आहे. आश्चर्य म्हणजे हरियाणात आयएनएलडी आणि काँग्रेस या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी हातमिळवणी केल्यामुळे वकील आर. के. आनंद यांचा विजय सुलभ होणार आहे. परिणामी भाजपाचा पाठिंबा असलेले माध्यमसम्राट सुभाष चंद्रा यांच्यापुढे संकट आहे. उत्तर प्रदेशात कपिल सिब्बल, मध्य प्रदेशात विवेक तनखा, उत्तराखंडमध्ये प्रदीप ताम्टा या काँग्रेस उमेदवारांना बसपा आणि अन्य छोट्या पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. या तीन (पान ७ वर)भाजपला
जबर धक्का ?
(पान १ वरून) राज्यांमध्ये अपक्षांना निवडून आणण्याची भाजपला फारच कमी संधी आहे. उत्तर प्रदेशात भाजपने प्रीती महापात्रा, मध्य प्रदेशात विनोद गोटिया आणि उत्तराखंडमध्ये गीता ठाकूर यांना पाठिंबा जाहीर करीत चुरस वाढविली आहे. जातीयवादी शक्तींविरुद्ध लढा असल्याचे सांगत मायावतींनी भाजपला पराभूत करण्याचे संकेत दिले आहेत. झारखंडमध्ये झामुमोचे उमेदवार बसंत सोरेन यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे. दुसरी जागा जिंकण्यासाठी सोरेन यांना सहा मते कमी पडत आहेत. पहिल्या जागी भाजपचे मुख्तार अब्बास नकवी यांचा विजय मात्र निश्चित मानला जातो. पण भाजपच्या महेश पोद्दार यांचा विजयही अवघड ठरेल. राजस्थानमध्ये सर्व चारही जागा भाजपच्या झोळीत पडतील, कारण या पक्षाला १६४ पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन लाभले आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस समर्थित कमल मोरारका यांची जागा धोक्यात आहे. कर्नाटकची राज्यसभा निवडणूक रद्द करण्याची भाजपने केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जद(एस)चे बी.एम. फारूक विजयी होतील, असे मानले जाते.
>२६ जागांचा निकाल
सात राज्यांमधील राज्यसभेच्या २६ जागांचा निकाल आज मतदानानंतर जाहीर होईल. नऊ राज्यांमधील ३२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्णत्वास जाईल. सात केंद्रीय मंत्री राज्यसभेवर निवडून जात आहेत.