अपघातानंतर रेल्वेची बचाव यंत्रणा कशी काम करते, काय आहे SOP? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 22:01 IST2025-01-22T21:59:42+5:302025-01-22T22:01:04+5:30
Pushpak Express Train Accident: अपघातानंतर रेल्वे विभागाकडून तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

अपघातानंतर रेल्वेची बचाव यंत्रणा कशी काम करते, काय आहे SOP? जाणून घ्या...
Pushpak Express Train Accident : जळगाव येथे भीषण झालेल्या रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर अनेकांनी ट्रेनमधून बाहेर उड्या मारल्या, यादरम्यान दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने लोकांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून, 40 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, रेल्वेची बचाव यंत्रणा कशी काम करते, त्याबाबत काय नियम आहेत? जाणून घ्या...
रेल्वेचे बचाव यंत्रणा कशी काम करते?
रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. या प्रवाशांची सुरक्षा रेल्वेची मोठी जबाबदारी आहे. यासाठी रेल्वेने अपघाताच्या वेळी दिलासा बचावासाठी क्विक रिस्पॉन्स सिस्टीम तयार केली असून, त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येते. अशा अपघातांच्या वेळी वैद्यकीय सुविधा देण्यासाठी रेल्वेकडे अपघात निवारण वैद्यकीय गाडी आहे, जी अपघाताच्या वेळी तात्काळ घटनास्थळी पाठवली जाते.
राजधानी-शताब्दी ते वंदे भारतही थांबते
जेव्हा एखादी अपघात निवारण वैद्यकीय गाडी घटनास्थळी रवाना केली जाते, तेव्हा त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या जातात, जेणेकरून एआरटी (अपघात निवारण ट्रेन) शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहोचू शकेल. रेल्वे SOP नुसार, राजधानी, शताब्दी आणि वंदे भारतसारख्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी गाड्यांनाही थांबावे लागते. एआरटी घटनास्थळी पोहोचते आणि जखमी प्रवाशांना वैद्यकीय सुविधा पुरवते.
अपघाताची नोंद कशी केली जाते?
रेल्वे अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित गार्ड, लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट जवळच्या स्टेशन मास्टरला अपघाताची माहिती देतात. यादरम्यान अपघाताचे गांभीर्य, जीवितहानी, रेल्वे मालमत्तेचे नुकसान आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सेक्शन कंट्रोलला ही माहिती दिली जाते. सेक्शन कंट्रोल ऑफिसर, डेप्युटी चीफ कंट्रोलर किंवा मुख्य कंट्रोलर ही माहिती डीआरएम किंवा एडीआरएमपर्यंत पोहोचवतात, त्यानंतर ही माहिती मीडियापर्यंत पोहोचते आणि विभाग स्तरावर त्याचा प्रसार केला जातो.