"नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची इनिंग, यात शंका नाही", पुष्पम प्रिया यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:56 PM2024-01-30T13:56:54+5:302024-01-30T13:57:22+5:30
बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर प्लुरल्स पार्टीच्या प्रमुख पुष्पम प्रिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे.
नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याशिवाय मास्क काढणार नाही, अशी शपथ घेतलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले आहे की, "नितीश कुमार यांची मुख्यमंत्री म्हणून ही शेवटची इनिंग आहे, यात शंका नाही. वीस महिने बाकी आहेत. ते निरोगी राहू देत, कारण बिहारला त्यांच्या वक्तव्यामुळे आणि वागण्यामुळे आणखी पेच सहन करावा लागू नये. जाता-जाता ते राज्याच्या हिताचे काहीतरी चांगले करतील, अशी आशा आहे. त्यांचे अभिनंदन."
पुष्पम प्रिया चौधरी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी (2020) शपथ घेतली होती. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याशिवाय चेहऱ्यावरील मास्क काढणार नाही, अशी शपथ पुष्पम प्रिया चौधरी यांनी घेतली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये नितीश कुमार जेव्हा त्यांचे वडील जेडीयू नेते विनोद कुमार चौधरी यांच्या श्राद्धानिमित्त पुष्पम प्रिया यांच्या घरी पोहोचले होते, तेव्हाही पुष्पम प्रिया यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढले नव्हते.
त्यावेळी पुष्पम प्रिया चौधरी म्हणाल्या होत्या की, नितीश कुमार यांचे माझ्या वडिलांशी कौटुंबिक संबंध होते. त्यांच्यासाठी नितीशकुमार हे नेते होते. नितीशकुमार यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. बिहारमधील परिस्थितीसाठी मी नितीशकुमारांना जबाबदार धरते. कौटुंबिक संबंध बाजूला आहे. मात्र आजही मी राजकीयदृष्ट्या नितीशकुमारांच्या विरोधात आहे.
दरम्यान, नुकतेच जेव्हा नितीश कुमार यांच्या सरकारने पंचायत प्रतिनिधींचे वेतन आणि भत्ते वाढवले होते, तेव्हा पुष्पम प्रिया चौधरी यांनी सरकारची खिल्ली उडवली होती. सरकारने पंचायत प्रतिनिधींचे मानधन 2500 रुपयांवरून 5000 हजार रुपयांपर्यंत वाढवून एक उपकार केले आहे. विधानसभा प्रतिनिधींना लाखो रुपये पगार व इतर भत्ते व सुविधा मिळतात. त्याच बिहारमध्ये पंचायत प्रतिनिधींना चिल्लर दिली जात आहे, असे पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले होते.