सैनिकांना हृदयात स्थान द्या
By admin | Published: March 14, 2016 12:21 AM2016-03-14T00:21:38+5:302016-03-14T00:21:38+5:30
संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान
Next
स भाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्माननागपूर : सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत देश व देशवासीयांचे संरक्षण करीत असतात. त्यांची केवळ संकटकाळात आठवण करू नका. त्यांना हृदयात स्थान द्या असे आवाहन २२ मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे सेवानिवृत्त कमांडिंग ऑफिसर कर्नल संभाजी पाटील यांनी केले.मरणोपरांत अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित ९ पॅरा कमान्डो बटालियनचे लान्स नाईक शहीद मोहननाथ गोस्वामी यांना प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, त्यांच्या पत्नी भावना यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कर्नल पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल सुनील देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.शहीद गोस्वामी यांचा पराक्रम कधीच विसरता येणार नाही. सैनिक केवळ देशाच्या रक्षणासाठी लढत असतो. सैनिकांप्रमाणे नागरिकांनीही देशसेवेचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून चांगली व्यक्ती होणे आवश्यक आहे. केवळ ट्रकच्या मागे मेरा भारत महान लिहिल्याने काहीच होणार नाही. देशप्रेम मनात जागवले पाहिजे. शिस्त विकासाचा पाया आहे. शिस्त पाळणारा देशच विकास करू शकतो असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या आठवणीही सांगितल्या. बलिदान जीवनाचे सत्य आहे. देशासाठी सर्वस्व समर्पित करणे आपली परंपरा आहे. अशी व्यक्ती पूज्यनिय असते असे तिवारी यांनी सांगितले. तसेच, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर खंत व्यक्त केली. आज आपण विशिष्ट प्रसंगीच सैनिकांची आठवण काढतो. अभ्यासक्रमातून सैनिकांच्या पराक्रमाचे धडे काढून टाकण्यात आले आहेत. देशाचा संपूर्ण इतिहास शहिदांनी भरलेला आहे. परंतु, कोणालाही शहिदांची नावे माहिती नाहीत. देशाचा विकास तरुणांवर अवलंबून आहे. विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारा धर्म व जातीभेद तरुणांनी नष्ट करावा. तसे झाल्यास देशाच्या अखंडतेला काहीच धोका राहणार नाही असे ते म्हणाले.----------------भावना गोस्वामी भावुक झाल्या सन्मानाला उत्तर देताना भावना गोस्वामी भावुक झाल्या होत्या. यामुळे कार्यक्रमात उपस्थित अनेकांचा कंठ दाटून आला. भावना यांनी पतीवर गर्व वाटत असल्याचे व त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे मनोगत व्यक्त केले. तसेच, पतीचा सन्मान केल्यामुळे आभार मानले.