जेलमध्ये टीव्ही लावून द्या, यूरो कप बघायचाय; 'बाहुबली' आमदाराची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:34 PM2021-07-06T14:34:29+5:302021-07-06T16:06:59+5:30
'Bahubali' MLA Mukhtar Ansari news: स्वतः खेळाडू असल्याचे सांगत मुख्तार अन्सारीने टीव्हीची मागणी केली आहे
बाराबंकी: उत्तर प्रदेशातील बांदाच्या तुरुंगात कैद असलेल्या बाहुबली बसपा आमदार मुख्तार अन्सारीने सुनावणीदरम्यान परत एकदा तुरुंगात टीव्ही पाहू देण्याची मागणी केली आहे. बनावट अॅम्ब्युलन्सप्रकरणात सोमवारी झालेल्या व्हर्चुअल सुनावणीदरम्यान मुख्तार अंसारीने स्वतः खेळाडू असल्याचे सांगत न्यायाधीशांकडे यूरोपमध्ये सुरू असलेला यूरो-2020 फुटबॉल चषक (UEFA EURO 2020) पाहण्यासाठी टीव्ही देण्याची मागणी केली. (Strange demand of 'Bahubali' MLA)
बनावट अॅम्ब्युलन्सप्रकरणी मुख्तार अन्सारीचे वकील रणधीर सुमनने सांगितल्यानुसार, अन्सारीने न्यायालयात म्हटले की, संपूर्ण राज्यात कैद्यांना टीव्ही पाहू दिला जातो. पण, मला टीव्हीपासून दूर ठेवले जात आहे. मी खेळाडू आहे, मला सध्या सुरू असलेला यूरो 2020 फुटबॉल कप (UEFA EURO 2020) पाहायचा आहे. मला टीव्ही पाहण्याची परवानगी द्यावी, असे त्याने म्हटले. तसेच, मी 16 वर्षांपासून तुरुंगात कैद असून, फक्त राज्यकीय द्वेषापोटी या प्रकरणात अडकवले जात असल्याचे तो म्हणाला.
अॅम्ब्युलन्स प्रकरणात आरोपपत्र दाखल
आमदार मुख्तार अंसारीच्या बनावट पत्त्याच्या आयडीवरील रजिस्ट्रेशनप्रकरणी पोलिसांनी सोमवारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात मुख्तार अन्सारीसह तुरुंगातील इतर 7 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपपत्र दाखल करण्यात उशीर झाल्याने खटल्यात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणातील तुरुंगात पाठवलेला पहिला आरोपी राजनाथ यादवचा तुरुंगवास 90 दिवसांच्या पुढे जात होता.
तात्काळ आरोपपत्र दाखल झाले नसते, तर न्यायालयाला नाईलाजाने यादवला सोडावे लागले असते. पण, पोलिसांकडून वकील महेंद्र प्रताप सिंह सोमवारी कोर्टात दाखल झाले आणि मुख्तार अन्सारीच्या बनावट अॅम्ब्युलन्स प्रकरणात मऊतील शाम संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.अल्का राय, सीएचसीचे सरकारी डॉक्टर शेषनाथ राय, मुख्तार अंसारीचे प्रतिनिधि मुजाहिद, मुजाहिदचे साथीदार राजनाथ यादव, आनंद यादव, अँब्यूलंस चालक सलीमविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील इतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात आरोपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.