हिंसाचाराला पायबंद घाला!
By admin | Published: May 4, 2017 03:28 AM2017-05-04T03:28:23+5:302017-05-04T03:28:23+5:30
वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली
नवी दिल्ली : ओडिशामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्तारूढ बिजदकडून राजकीय विरोधकांविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. भाजपाच्या दुसऱ्या एका शिष्टमंडळाने याच हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागितली आहे.
पेट्रोलियम न नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्ली येथे राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रधान म्हणाले, ‘ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील कालीकुंडा या गावात शेळीपालन करून आपली गुजराण करणाऱ्या पार्वती सासमल या गरीब महिलेने नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला मतदान केले म्हणून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पार्वतीने तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रोड शोदरम्यान निवेदनही सादर केले होते. पंतप्रधानांना निवेदन देऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत परत येत असताना बिजदच्या गुंडांनी तिच्यावर पुन्हा भीषण हल्ला केला.’
ओडिशातील सत्तारूढ बिजदतर्फे राजकीय विरोधकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. तेथील पंचायत निवडणुकीच्या आधी आणि नंतर अशा हिंसाचारात किमान १० जण मारले गेले आहेत. राज्यात अशा प्रकारचा राजकीय हिंसाचार याआधी कधीही पाहिलेला नाही, असे प्रधान म्हणाले.
सत्तारूढ बिजदचा जनाधार वेगाने ढासळतो आहे आणि त्यामुळे बिजद हिंसक बनली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात तत्काळ हस्तक्षेप करावा आणि बिजदच्या हिंसाचाराला बळी ठरलेल्या गरीब महिला व इतरांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती प्रधान यांनी केली. भाजपाच्या या शिष्टमंडळात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संदीप पात्रा, ओडिशाचे भाजपा सरचिटणीस पृथ्वीराज हरिचंदन, प्रदेश सचिव डॉ. लेखाश्री सामंतसिंघर यांचा समावेश होता.