संरक्षणच नाही, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीही पुतीन यांची भारत भेट ठरणार महत्त्वपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 10:14 AM2018-10-04T10:14:42+5:302018-10-04T10:15:23+5:30
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे.
नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे. भारत आणि रशियामध्ये एस-400 क्षेपणास्त्र करार होण्याची शक्यता असल्याने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र केवळ संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनेच नव्हे तर अंतराळ संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या दृष्टीनेही पुतीन यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे. त्या चर्चेवेळी संरक्षण क्षेत्रातील भागीदारीबाबत चर्चा होऊन एस-400 क्षेपणास्र करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. तसेच इतर महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवरही सहमती होऊ शकते.
संरक्षण क्षेत्राबरोबरच अंतराळ संशोधनातील सहकार्याबाबत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये निर्णय होऊ शकतो. त्यामुळे 2022 साली चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या घोषणेला बळ मिळू शकेल. तसेच या मोहिमेसाठी रशिया साहित्य आणि प्रशिक्षण देऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील भागीदारीबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताने रशियातील ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, पुतीन यांच्या या दौ-याचा मुख्य उद्देश एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आहे. एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार 5 अब्ज डॉलरचा होणार आहे. परंतु अमेरिकेचा या कराराला तीव्र विरोध आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौ-यात पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अधिकृतरीत्या चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये रशियाचाही समावेश आहे. तसेच भारताबरोबर दरवर्षी द्विपक्षीय चर्चा करणारा जपान हा दुसरा देश आहे. भारत-रशियादरम्यानच्या द्विपक्षीय संबंध हे विशेष महत्त्वाचे आहेत.