...तर आम्ही भारतात परतलो नसतो, कतारमधून सुटकेनंतर माजी नौदल अधिकारी मोदींबाबत म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 08:38 AM2024-02-12T08:38:29+5:302024-02-12T08:40:24+5:30
Qatar Release Eight Indian Nationals: कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे मातृभूमीत परतल्यानंतर या अधिकाऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे मातृभूमीत परतल्यानंतर या अधिकाऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. भारतात परतल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अधिकाऱ्यांनी सुटकेचं श्रेयं दिलं आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही मायदेशात परतू शकलो, असे या माजी नौदल अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या नौदल अधिकाऱ्यांची कतारने काल रात्री सुटका केली होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यापैकी सात जण मायदेशी परतले.
कतारमधून मायदेशी परतलेल्या नौसैनिकांपैकी एकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही भारतात परतण्यासाठी सुमारे १८ महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप आभार मानतो. मोदींनी केलेल्या वैयक्तिक हस्तक्षेपाविना आमची सुटका शक्य झाली नसती. आमच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी त्यांचे आभार मानतो.
सुटका झालेल्या आणखी एका माजी नौदल अधिकाऱ्याने सांगितले की, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपाविना आमचं इथे उभं राहणं शक्य झालं नसतं. भारत सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आमची सुटका झाली आहे’’. २०२२ पासून कतारमधील तुरुंगात कैदेत असलेल्या या माजी नौदल अधिकाऱ्यांवर एका पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या माजी नौदल अधिकाऱ्यांवरील आरोप सार्वजनिक करण्यात आले नव्हते.
या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत सरकार दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या मुक्ततेचं स्वागत करत आहे. ज्या अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. आम्ही या भारतीय नागरिकांची मुक्तता करण्याच्या आणि मायदेशी परत पाठवण्याच्या निर्णयाबाबत कतारच्या अमिर यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो.
कतारमध्ये अटकेची कारवाई आणि नंतर फाशीची शिक्षा झालेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांमध्ये कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला . कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश गोपालकुमार यांचा समावेश होता.