CoronaVirus News: प्रेयसीला भेटण्यासाठी क्वारंटिन सेंटरमधून पळाले; दारू, गांजा घेऊन परत आले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:48 AM2020-06-15T03:48:57+5:302020-06-15T07:09:01+5:30
मणिपूरमधील घटना; क्वारंटाईन सेंटरमधून पलायन
गुवाहाटी : मणिपूर येथील तामेंगलाँग येथे क्वारंटाइनमध्ये ठेवलेले दोन युवक तिथून पलायन करून आपापल्या प्रेयसींना भेटायला गेले. त्यानंतर क्वारंटाइन केंद्रामध्ये परत येताना त्या दोघांनी आपल्यासोबत दारू, सिगरेट, गांजा आणला व त्याची विक्री तेथील रुग्णाला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या गोष्टीला अखेर वाचा फुटून सरकारी यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे. क्वारंटाइनमधून पळून गेल्यानंतर या युवकांनी आपापल्या प्रेयसींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या घरून आपल्या बाईकही क्वारंटाइन केंद्रामध्ये आणल्या. या केंद्रात एका रुग्णाला हवी असलेली गांजा, सिगरेटची चार पाकिटे त्याला या युवकांनी दिली. नेमके त्याच वेळी सरकारी अधिकाऱ्यांनी या युवकांना रंगेहाथ पकडले. हे युवक कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याने कोणीही त्यांना हात लावण्याची तसेच मारहाण करण्याचीही हिंमत केली नाही. कोरोनाच्या साथीमुळे सध्या सगळे तुरुंग बंदच असल्यामुळे या दोन युवकांना अटक करून तिथे धाडण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना साथीसारख्या भयानक आजारातून बरे होण्यासाठी रुग्णांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते. मात्र त्या उद्देशाला या दोन युवकांनी वाईट कृत्ये करून हरताळ फासला, असे मत सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)
क्वारंटाईन केंद्रातील सारेच झाले अचंबित
क्वारंटाइन केंद्रामध्ये गैरव्यवस्था असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. पण मणिपूरमध्ये दोन युवकांनी क्वारंटाइन केंद्रामध्ये केलेल्या प्रकारामुळे सारेच अचंबित झाले आहेत. व्यसनाधीन लोकांची लॉकडाऊनच्या काळात पंचाईत झाली आहे. अशा मंडळींना कोरोनाची लागण झाली तर त्यांचा जीव आणखी कासावीस होतो आणि आपल्याला हव्या त्या वस्तू मिळविण्यासाठी ते वाट्टेल ते कृत्य करतात. त्याचीच झलक मणिपूरच्या क्वारंटाइन केंद्रात दिसून आली.