बांधकाम कामगारांचे प्रश्न संसदेत
By admin | Published: August 6, 2016 04:02 AM2016-08-06T04:02:00+5:302016-08-06T04:02:00+5:30
इमारत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेचे लक्ष वेधले.
नवी दिल्ली : इमारत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेचे लक्ष वेधले. बांधकाम व्यावसायिकांकडून एकूण प्रकल्पाच्या एक टक्के सेस गोळा करून त्या निधीतून कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र केरळ वगळता इतर राज्यांनी अपेक्षेएवढा निधी खर्च केला नसल्याचे शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
‘लोकमत’ने समूह आरोग्य विमा योजनेसह कामगारांच्या मांडलेल्या प्रश्नांची शिंदे यांनी दखल घेतली आणि त्याकडे सभागृहाच्या सदस्यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे तीन हजार कोटी रुपये
निधी जमा झाला आहे. मात्र त्यातील केवळ ५ टक्के निधी खर्च झाला. तर केरळने ९४ टक्के निधी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रात तब्बल दोन कोटी लोक काम करतात. मात्र कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे मंडळांचे दुर्लक्ष होत असल्याचे
त्यांनी सांगितले. कामगारांच्या कौशल्य विकासावरही निधी खर्च
होत नसल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>महाराष्ट्रात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दीड वर्षात सहा लाख कामगारांची नोंद केली आहे. सध्या मी राज्याचा दौरा करून कामगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. कामगारांना सुविधा देण्यास मंडळाचे प्राधान्य असेल.
- ओमप्रकाश यादव, अध्यक्ष, इमारत कामगार कल्याणकारी मंडळ