भारताच्या वाघ यशकथेवर ‘आॅक्सफर्ड’चे प्रश्नचिन्ह
By admin | Published: February 24, 2015 11:17 PM2015-02-24T23:17:45+5:302015-02-24T23:17:45+5:30
भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या
लंडन : भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. या गटाने चुकीची संशोधन पद्धती अवलंबल्याने भारत सरकारच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाघ आणि इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण पद्धतीत अचूकतेच्या दृष्टीने अनेक कमतरता आहेत. यामुळे अशा सर्वेक्षणांची अचूकता संशयाच्या भोवऱ्यात सापडते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका गटाने प्रथमच वाघांच्या गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या वापरात असलेल्या ‘अंश शोधन निर्देशांक’ पद्धतीत अंगभूत कमतरता आहेत. यामुळे अचूक निष्कर्ष निघणे अडचणीचे ठरते असा दावा या गटाने केला आहे.
भारतीय राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण संस्थेने जानेवारी २०१५ च्या अहवालात वाघांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये २,२२६ वाघ होते. २०१० मधील वाघांच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ नोंदली गेली आहे.
‘आमच्या अभ्यासातून अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती संशोधनासाठी कुचकामी असल्याचे दिसून येते. भारतीय वाघ सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा अनुभवाधिष्ठित पद्धतीने अभ्यास केला. यात अंश शोधन पुनरुत्पादनीय आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट होते,’ असा दावा या अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)