अवकाळी पावसाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय खासदार एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:26 AM2019-11-19T01:26:36+5:302019-11-19T02:05:15+5:30
महाराष्ट्रातील खासदारांचा आक्रमक पवित्रा
नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले की, कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात जास्त नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, मका, धान, सोयाबीन व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांना तात्काळ प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी. नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील शेतकºयांसाठी ५० हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या निमित्ताने राहुल शेवाळे यांनी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या आखत्यारीत आणणारा कायदा करण्याची मागणी व पीएमसी बँकेला पुनरुज्जीवित करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.
श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथ
सातारा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले श्रीनिवास पाटील यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्राविषयी भाष्य केले.