इतरांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला कशामुळे?, विद्यार्थ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:02 AM2018-03-30T05:02:08+5:302018-03-30T05:02:08+5:30
सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विष
नवी दिल्ली : सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्या विषयांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. पेपरफुटीला आम्ही दोषी नाही, आम्ही वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिली. मग काहींच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल ते करीत आहेत.
या परीक्षेसाठी तारखांची घोषणा सोमवारी वा मंगळवारी होऊ शकते, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पेपरफुटीप्रकरणी कोचिंग क्लासवर संशय असून, विकी या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य २५ जणांची चौकशी सुरू आहे.
काही विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सकाळी त्यांना लिफाफा मिळाला. त्यात बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरचे उत्तर होते. पोलिसांनी बारावी अर्थशास्त्र व दहावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत बोर्डाने म्हटले आहे की, त्यांना २३ मार्च रोजी अज्ञात ठिकाणाहून एक फॅक्स आला. राजेंद्रनगरमध्ये कोचिंग क्लास चालविणारी एक व्यक्ती पेपरफुटीत सहभागी आहे, असे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीत दोन शाळांची नावेही होती. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. ‘आमच्या आयुष्याशी खेळू नका’ असे फलक ते झळकावत होते. या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, जवळपास सर्वच पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी फुटले होते. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यायची असल्यास सर्वच विषयांची घ्यावी. काही विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, दोन विषयांची पुन्हा परीक्षा घेण्याच्या घोषणेमुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत.
मीही शांतपणे झोपू शकत नाही !
पेपरफुटी प्रकरणात दोषींना सोडणार नाही, असे सांगतानाच मीही पालक आहे आणि असे घडल्याने निश्चिंत झोपू शकत नाही, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर गुरुवारी म्हणाले. या घटनेने सीबीएसईच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून परीक्षा व्यवस्थेत बदलासह सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ती परीक्षा पुन्हा होणार आहे. पालकांचा त्रास मी समजू शकतो. विद्यार्थ्यांची काय अवस्था होते याची मला जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्याच राज्यात होणार परीक्षा?
ज्या राज्यात प्रश्नपत्रिका लीक झाली त्याच राज्यात पुन्हा परिक्षा घेण्याचा विचार सध्या सुरू आहे. जर १० वी गणिताची परिक्षा पूर्ण देशात झाली तर, १६.३८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परिक्षा द्यावी लागेल. पण, कमी विद्यार्थ्यांची जर पुन्हा परीक्षा झाली तर, याचे निकालही वेळेवर लागतील.