राहुलच्या नेतृत्वावर प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 01:44 AM2015-04-15T01:44:11+5:302015-04-15T01:44:11+5:30
काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष बनविण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यादेखील सामील झाल्या आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष बनविण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यादेखील सामील झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत ‘शंका’ आहे व सोनिया गांधी यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहिले पाहिजे, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधींच्या नेतृत्वात एक प्रकारची ‘सहजता’ असते व पक्षाच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्या अतियशस्वी आणि नियंत्रित नेतृत्वावर विश्वास ठेवला जाऊ शकेल, असे ७७ वर्षीय शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या, ‘काय घडेल आणि काय घडणार नाही, हे मी सांगू शकणार नाही. राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनविले जाऊ शकते; परंतु सोनिया गांधी यांचे नियंत्रण आणि अति यशस्वी नेतृत्व राहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सहजता वाटते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची अद्याप चांगल्याप्रकारे पारख झालेली नाही व सोनिया गांधी यांनीच नेतृत्व करीत राहणे हे पक्षासाठी चांगले राहील.
राहुल यांना पक्षाध्यक्षपदी नियुक्त करावे किंवा नाही, यावरून काँग्रेसमध्येच दोन विचारप्रवाह निर्माण झालेले असताना दीक्षित यांनी हे विधान केले आहे.