नातेवाईकांचं ऐकलं अन् IAS बनण्याची इच्छा झाली; चांगली नोकरी सोडली, ५ वेळा फेल तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:30 PM2024-06-20T15:30:40+5:302024-06-20T16:45:22+5:30
जिद्द, मेहनत आणि चिकाटी आपल्याकडे असेल तर कितीही कठीण परीक्षेत आपल्याला यश मिळतेच.
नवी दिल्ली - शिक्षणात हुशार, पदवीही घेतलीय...मग खासगी नोकरी कधीपर्यंत करणार? तू यूपीएससी द्यायला हवी..हरियाणाच्या अंबाला इथं राहणाऱ्या आकृती सेठीला तिच्या नातेवाईकांनी हा सल्ला दिला आणि ती विचारात पडली. यूपीएससीची तयारी करणं फार सोप्पं नाही. अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. कदाचित नोकरीही सोडावी लागू शकते. इतके करूनही परीक्षेत यश मिळालं नाही तर..यासारखे अनेक प्रश्न आकृतीच्या मनात घोंगावत होते.
ही कहाणी आकृती सेठी या तरूणीची, जिनं नातेवाईकांचं ऐकून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय तर घेतला परंतु ती सलग ५ वेळा प्रीलिम्सही पास करू शकली नाही. कुठल्याही व्यक्तीला अपयशातून यशाकडे जाण्यासाठी जी हिंमत लागते ती १-२ वेळाच उपयोगी पडते. परंतु तब्बल ५ वेळा अपयश पत्करूनही आकृतीनं हिंमत हरली नव्हती. सहाव्या प्रयत्नात आकृतीच्या आयुष्यानं वेगळेच वळण घेतले.
शिक्षणाच्या बाबतीत आकृती कायमच अव्वल राहिली. दिल्ली यूनिवर्सिटीतून आकृतीनं पदवी घेतली त्यानंतर एका खासगी कंपनीत ती नोकरी करू लागली. नोकरीसोबतच आकृतीने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी देण्याचा विचारही तिच्या मनात नव्हता. परंतु एका नातेवाईकानं सांगितले आणि आकृतीने तिची नोकरी सोडून दिली. २०१७ साली पहिल्यांदा आकृतीने यूपीएससी परीक्षा दिली. प्रीलिम्समध्ये अपयश आलं, नोकरी सोडून परीक्षेत यश न आल्यानं आकृती निराश झाली.
मात्र कुटुंबानं आकृतीला पाठिंबा दिला, पुढील वर्षी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु निकाल पुन्हा तोच लागला. आकृती प्रीलिम्स परीक्षा पास होत नव्हती. सलग ५ वेळा तिच्या पदरी निराशा आली. २०२१ पर्यंत ती अपयशी ठरली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून आकृतीने ४ वर्ष परीक्षेची तयारी केली. मात्र आता हातात नोकरीही नाही आणि परीक्षेतही समाधानकारक यश नाही. मात्र आकृतीच्या वडिलांनी कधीही तिच्यावर दबाव टाकला नाही. प्रत्येक परीक्षेला आकृतीसोबत तिने वडील यायचे. अपयश मिळालं तरी हिंमतीने मुलीला पुन्हा बळ द्यायचे.
अखेर २०२२ मध्ये आकृती सहाव्या प्रयत्नात यशस्वी झाली. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आकृतीनं यूपीएससीची तयारी केली आणि निकाल घोषित झाल्यानंतर आकृतीसह तिच्या कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आकृती UPSC परीक्षेत २४९ वी रँक मिळवली होती. जर आपण मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली तर सर्वकाही ठीक होते. आकृतीला सहाव्यांदा परीक्षा देण्यासाठी कुटुंबाचं पाठबळ मिळालं आणि त्यातूनच तिने यश मिळवले.