लालकृष्ण अडवाणींना अटक करणा-या अधिका-याला मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 12:05 PM2017-09-04T12:05:35+5:302017-09-04T12:07:33+5:30

माजी सनदी अधिकारी राजकुमार सिंह तेच अधिकारी आहेत, ज्यांनी 1990 रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली होती. 

R K Singh who had arrested L K Advani gets entry in modi cabinet | लालकृष्ण अडवाणींना अटक करणा-या अधिका-याला मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद

लालकृष्ण अडवाणींना अटक करणा-या अधिका-याला मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद

Next

नवी दिल्ली, दि. 4 - केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात माजी सनदी अधिकारी राजकुमार सिंह यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर ऊर्जा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आर के सिंह यांच्याकडे ऊर्जा व वैकल्पिक ऊर्जा स्रोत खातं सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आर के सिंह तेच अधिकारी आहेत, ज्यांनी 1990 रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली होती. 

माजी गृहसचिव आणि बिहारमधील आरा येथील लोकसभा खासदार असलेल्या आर के सिंह यांनी नेहमीच आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी चोख बजावली आहे. आयएएस अधिकारी म्हणून त्यांची वाटचाल खूपच यशस्वी आणि चांगली राहिली आहे. 2013 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 

बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी 1990 रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अटकेचा आदेश दिल्यानंतर 64 वर्षीय आर के सिंह यांचं नाव चर्चेत आलं होतं. लालूप्रसाद यादव यांनी आर के सिंह यांच्यावर ही अटकेची जबाबदारी सोपवली होती. समस्तीपूर येथून ही अटक करायची होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरु होती. समस्तीपूर येथे अडवाणींची रथयात्रा आल्यानंतर आर के सिंह यांनी त्यांना अटक केली होती. 

1975 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या आर के सिंह यांनी निवृत्तीनंतर 2013 रोजी भाजपात प्रवेश केला होता. आर के सिंह यांना बिहारसोबत केंद्रातही अनेक महत्वाची पदं देण्यात आली होती. युपीए सरकार सत्तेत असताना ते संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव होते. त्यानंतर अडवाणी गृहमंत्री असताना गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.  

2014 मध्ये त्यांनी बिहारमधील आरा येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. पोलीस आणि कारागृहांच्या आधुनिकीकरणात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं असून, त्यासाठी त्यांना मुख्यत्वे ओळखलं जातं. विशेष म्हणजे आर के सिंह गृहसचिव असतानाच मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. गृहचसिव म्हणून त्यांच्यावर मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेस स्फोटामधील कथित भगव्या दहशतवादाच्या तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. काही संशयितांची नावे सार्वजनिक केल्याने ते वादात अडकले होते. 

मोदी सरकारमध्ये आर के सिंह यांना जागा मिळाल्याने भाजपा नेतृत्वावरचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित होत आहे. आर के सिंह यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कायद्याची पदवी घेतली होती. नेदरलँडच्या आरव्हीबी ड्वेल्फ विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी ते गेले होते. आयएएस होण्यापूर्वी ते आयपीएसची परीक्षाही उत्तीर्ण झाले होते.
 

Web Title: R K Singh who had arrested L K Advani gets entry in modi cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.