रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव व चंद्राबाबू नायडूंनाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:10 AM2018-09-09T04:10:19+5:302018-09-09T04:10:32+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लोकसभेतील कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण दिले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १७ ते १९ सप्टेंबर या काळात दिल्लीच्या विज्ञान भवनात होणाऱ्या ‘भविष्यातील भारत-संघाचा दृष्टीकोन’ या विषयावरील शिबिरासाठी आता बसपाच्या प्रमुख मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लोकसभेतील कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण दिले आहे.
कार्यक्रमासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांना निमंत्रण दिल्याची माहिती संघाचे प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी दिली होती. मात्र निमंत्रण मिळाले नसून, ते मिळाल्यानंतर पक्ष भूमिका जाहीर करेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. संघाच्या व्यासपीठावर राहुल यांनी जाऊ नये, असे अनेक नेत्यांनी नमूद केले होेते. त्यामुळे राहुल गांधी काय करणार, ही उत्सुकता कायम आहे.
पण आता जवळपास सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री व विविध क्षेत्रांतील मान्यवर अशा सुमारे तीन हजार लोकांना संघाने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. याखेरीज विविध धार्मिक गुरू व नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनाही संघाने या कार्यक्रमासाठी बोलावले आहे.
ममता बॅनर्जी, खरगे, मायावती, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव हे सारे नेते संघाच्या कार्यक्रमाला जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात ते जाण्याची शक्यता कमी असल्याचा संघाचाही अंदाज आहे. पण आम्ही राजकीय अस्पृश्यता पाळत नाही आणि केवळ भाजपाच्या नेत्यांनाच बोलावत नाही, हे दाखवण्यासाठी संघाने या साºयांना निमंत्रित केल्याचे समजते. यापैकी एकाही नेत्याचा कधीही संघाशी अप्रत्यक्षही संबंध आलेला नाही. तसेच हे सारे संघाचे कडवे टीकाकार आहेत.
>आम्ही तिथे का जावे?
अधिकाधिक लोकांना संघाचे विचार व कार्यप्रणाली याविषयी माहिती देण्यासाठी बोलावले आहे. अर्थात, कोणाला बोलावले, हे आम्ही जाहीर करणार नाही, असे संघाच्या एका पदाधिकाºयाने सांगितले. तिथे केवळ हिंदुत्वाविषयीच बोलले जाणार असेल आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली जाणार असेल, तर आम्ही तिथे का जावे, असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला.