Coronavirus: कोरोना लसनिर्मितीची शर्यत; भारत आघाडीवर, जाणून घ्या 'या' ३ लशीची सद्यस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 03:46 AM2020-11-29T03:46:44+5:302020-11-29T07:16:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तीनही शहरांचा धावता दौरा करत लस संशोधन कार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर तीन प्रकल्पांची थोडक्यात माहिती...
कोरोनाला वेसण घालण्यासाठी त्यावर प्रतिबंधक लस संशोधनाच्या या शर्यतीत भारतही आघाडीवर आहे. भारतात अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी लस संशोधनाचे काम प्रगतिपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तीनही शहरांचा धावता दौरा करत लस संशोधन कार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर तीन प्रकल्पांची थोडक्यात माहिती...
लसीचे नाव : झायकोव-डी
फॉर्म्युला : झायडस बायोटेक
कंपनीचे नाव : झायडस बायोटेक
सद्य:स्थिती : तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू
पूर्णपणे स्वदेशी असलेल्या झायकोव-डी या लसीवर झायडस बायोटेक कंपनीत जुलै महिन्यापासून संशोधन सुरू आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याही झाल्या आहेत. झाय़कोव-डी ही लस पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. या लसीच्या किती मात्रा लागतील, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.
लसीचे नाव : कोविशील्ड
फॉर्म्युला : ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका ही ब्रिटिश औषध कंपनी
कंपनीचे नाव : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
सद्य:स्थिती : चाचण्या अंतिम टप्प्यात
सर्वाधिक प्रमाणात लस बनविणारी संस्था असा जगभरात नावलौकिक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्डच्या १ अब्ज मात्रांसाठी ॲस्ट्राझेनेकाशी करार केला आहे. भारतात सर्वप्रथम हीच लस तयार होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. कोविशील्ड लसीच्या सरासरी ७२ टक्के मात्रा मानवी चाचण्यांमध्ये परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. जानेवारी, २०२१ पासून दरमहा ५ ते ६ कोटी लसी सीरममध्ये तयार केल्या जातील, असे अपेक्षित आहे.
लसीचे नाव : कोव्हॅक्सिन
फॉर्म्युला : भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)
कंपनीचे नाव : भारत बायोटेक
सद्य:स्थिती : तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू
कोव्हॅक्सिन या लसीच्या निर्मितीसाठी भारत बायोटेक व आयसीएमआर एकत्र आले आहेत. २६ हजार लोकांवर या लसीचे प्रयोग करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सध्या सुरू आहेत. जानेवारीपर्यंत त्याचे निष्कर्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी अंबाला कॅन्टोन्मेंटमधील एका रुग्णालयात या लसीची एक मात्रा घेतली आहे. मोठ्या समुदायावरील लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या सुुरुवातीलाच कंपनी या लसीच्या वापराबाबत सरकारकडे परवानगी मागेल.