चीनला टक्कर देण्यासाठी INS Kalvari सज्ज, रडारलाही नाही सापडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 01:17 PM2017-08-04T13:17:04+5:302017-08-04T13:39:48+5:30
भारताचं नौदल सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. गेल्या 11 वर्षांनंतर भारतीय नौदल एका ताकदवान पाणबुडीचा स्वतःच्या ताफ्यात समावेश करणार आहे
नवी दिल्ली, दि. 4 - भारताचं नौदल सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. भारतीय नौदल लवकरच एका ताकदवान पाणबुडीचा स्वतःच्या ताफ्यात समावेश करणार आहे. पुढच्या महिन्यात ही पाणबुडी समुद्रात उतरवली जाणार आहे. चीनच्या कथित युद्धाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताकडे अशी ताकदवान पाणबुडी असणं ही आनंददायक घटना आहे. INS Kalvari वर्गातील ही पाणबुडी शत्रूला न दिसताही त्याचा वेध घेणार आहे.
या पाणबुडीमुळे समुद्राच्या आतून युद्ध करण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होणार आहे. भारताजवळ 13 पाणबुड्या होत्या. ज्यांची संख्या आता हटवून 7 करण्यात आली आहे. यातील ब-याचशा पाणबुड्या या 20 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यामुळे भारतानं स्वतःचं नौदल सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला आहे. जेणेकरून युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास या पाणबुड्यांच्या योग्य प्रकारे वापर करता येईल. सद्यस्थितीत 6 मधली एक पाणबुडी लवकरच ताफ्यात दाखल होणार आहे. INS Kalvari हिंद महासागरात भारताच्या समुद्र सीमेचं संरक्षण करणार आहे. चीनजवळ सद्यस्थितीत 60 पाणबुड्या आहेत. चीननं जास्त करून पाणबुड्या या हिंद महासागरात नजर ठेवण्यासाठी सोडल्या आहेत. तसेच चीन स्वतःच्या पाणबुड्यांच्या माध्यमातून भारताच्या समुद्र हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशाला पाणबुड्या विकल्या आहेत. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली पाणबुडीही कराचीला पाठवली आहे. चीनजवळ आता आण्विक हल्ल्यासाठी तयार असलेल्या 5 पाणबुड्या असून, डिझेलवर चालणा-या 54 पाणबुड्या आहेत. पेंटॉगॉनच्या रिपोर्टनुसार 2020पर्यंत चीनकडे 78 पाणबुड्या असतील.
लष्करातील कुठल्याही एका दलाच्या बळावर युद्ध जिंकणे शक्य नाही. यासाठी तिन्ही दलांची एकत्रित कामगिरी आवश्यक असते. तिन्ही दलांच्या एकत्रित कामगिरीमुळेच हे शक्य आहे. प्रशांत महासागर ते अॅटलांटिक महासागरापर्यंत भारतील नौदलाचा दबदबा आहे, असंही नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा म्हणाले होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या दीक्षान्त समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
लांबा म्हणाले, ‘‘गल्फ ऑफ एडन, प्रशांत महासागर तसेच अॅटलांटिक महासागरात भारतीय नौदलाचा मुक्त संचार आहे. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी नौदल सक्षम आहे. कुठल्याही परिस्थितीसाठी नौदल सज्ज आहे.’’ भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ एका दलाच्या ताकदीवर ते जिंकता येणार नाही. यासाठी तिन्ही दलाचे एकत्रित प्रयत्न हवेत. यासाठीच्या तिन्ही दलाची एकत्रित अशी नवीन कमान होणे आवश्यक आहे. शासकीय पातळीवर असे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय तंत्रज्ञान आणि स्वदेशी जहाजांच्या निर्मितीला नौदलाने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 200 जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. 41 जहाजांचे काम सुरू आहे. यात पाणबुड्यांचाही समावेश आहे. देशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देत मेक इन इंडियाच्या योजनेनुसार देशातील उद्योगांच्या सहकार्याने नव्या जहाजांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आयएनएस विराट नौदलातून निवृत्त झाली आहे. विक्रांत 2च्या बांधणीचे काम सुरू आहे. विराटचे म्युझियम बनवण्याबाबत कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही लांबा म्हणाले होते.