मित्रांसोबत ५०० ची शर्यत लावली अन् रेल्वे अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:15 PM2022-09-13T17:15:18+5:302022-09-13T17:16:44+5:30
राज्यातील बरेली येथे मित्रा-मित्रांनी हसत-खेळत शर्यत लावली होती
बरेली - उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने चर्चेत असतात. अनेकदा चित्रपटांमधूनही येथील गुन्हेगारीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र, युपीत योगी आदित्यनाथ यांनी सत्ताकेंद्र हाती घेतल्यापासून या गुन्हेगारीला आळा बसल्याचा दावा सातत्याने सरकारकडून केला जातो. मात्र, पुन्हा एकदा येथील गुन्हेगारीचं उदाहरण देणारी घटना समोर आली आहे. एका युवकाने शर्यत लावून रेल्वेतील प्रशासकीय अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना उघडकीस आली आहे.
राज्यातील बरेली येथे मित्रा-मित्रांनी हसत-खेळत शर्यत लावली होती. त्यानुसार, रेल्वेच्या मंडल प्रशासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला कानशिलात लावू शकतो, अशी शर्यत एका युवकाने लावली होती. त्यानुसार ह्या युवकाने एसीएमच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला थप्पड लगावली. युवकाच्या या कृत्यामुळे कार्यालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. आरोपीचे नाव धिरेंद्र गंगावार असून इज्जतनगरच्या लिंकर एन्क्लेवचा रहिवाशी आहे. दरम्यान, शासकीय कामात अडथळा, अधिकाऱ्यास धमकी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोजकुमार हे इज्जतनगर रेल्वे प्रशासकीय विभागात सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आहेत. सोमवारी पावणे चारच्या सुमारास ते कार्यालयात बसले होते, त्यावेळी, अचानक एका युवकाने त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला, त्यानंतर धमकी देत मारहाण केली, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे. दरम्यान, कार्यालयातील गोंधळ ऐकून इतर कर्मचाऱ्यांनी युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिले. पोलिसांसमोर त्याने, मनोज आणि रवि या मित्रांसोबत ५०० रुपयांची शर्यत लावली होती, त्यामुळेच अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपी हा दारुच्या नशेत होता, त्यामुळे आपण कोणाला चापट मारली हेही त्याला माहिती नाही. केवळ मित्रांच्या सांगण्यावरुन त्याने हे कृत्य केलं. तर, मित्राने पूर्वनियोजित डाव रचला होता, असेही समजते. याप्रकरणी पोलीस मित्रांकडूनही अधिक चौकशी करत आहे.