इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 05:54 AM2024-05-05T05:54:14+5:302024-05-05T05:54:22+5:30
फ्रान्समधील लियोन येथे १९वी इंटरपोल परिषद नुकतीच पार पडली. त्याला सीबीआयचे संचालक प्रवीण सूद उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दहशतवादामध्ये चांगला व वाईट असा काही फरक नसतो. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरतावाद पसरविला जात असून त्याचा जागतिक सुरक्षेला मोठा धोका आहे, असे भारताने म्हटले आहे. फ्रान्समधील लियोन येथे १९वी इंटरपोल परिषद नुकतीच पार पडली. त्याला सीबीआयचे संचालक प्रवीण सूद उपस्थित होते.
सूद यांनी सांगितले की, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद व कट्टरपंथी विचारसरणी या गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरपंथी विचार पसरविले जात आहेत. ते रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली पाहिजेत. सर्वप्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध केला पाहिजे. या परिषदेला विविध देशांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते
२९ फरार आरोपींना आणले भारतात
जागतिक स्तरावरील संघटित गुन्हेगारी, सायबर गुन्हे रोखण्यासाठी एकजुटीने पावले उचलण्याबाबत १९व्या इंटरपोल परिषदेमध्ये चर्चा झाली. त्या मुद्द्यांना भारताने पाठिंबा दिला. भारताला हवे असलेल्या २९ फरारी गुन्हेगारांना २०२३मध्ये मायदेशात परत आणण्यात आले. इंटरपोलच्याच सहकार्याने ही कामगिरी करणे शक्य झाले, असेही सीबीआयने म्हटले आहे.