रेडिओ-टॅग्ड अमूर ससाणा भारतात परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:13 AM2019-05-05T06:13:55+5:302019-05-05T06:14:14+5:30
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून सफरीवर निघालेला एका मादी अमूर ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून थंडीनंतर भारतात परतला आहे.
इम्फाळ : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून सफरीवर निघालेला एका मादी अमूर ससाणा पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून थंडीनंतर भारतात परतला आहे. लोंगलेंग असे या पक्ष्याचे नामकरण करण्यात आले असून, ते नाव त्याला नागालँडमधील जिल्ह्यावरून देण्यात आले होते.
भारतातून निघाल्यावर या पक्ष्याने सोमालियात जाण्यासाठी सलग पाच दिवस नॉन-स्टॉप भरारी घेतली होती. उत्तरी चीनच्या एका वाईल्डिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या प्रजनन क्षेत्राच्या मार्गे हा पक्षी आता भारतीय उप-महाद्वीपामध्ये परत आला आहे. परतीच्या प्रवासात १८ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेतून सोमालियात हा पक्षी दाखल झाला होता. २९ एप्रिल रोजी त्याने आपला चार दिवसांचा परतीचा प्रवास सुरू केला व ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने हे अंतर कापले.
या पक्ष्याच्या प्रवासी मार्गावर निगराणी ठेवणारे पक्षीतज्ज्ञ आर. सुरेश कुमार यांनी सांगितले की, या पक्षाने खुल्या समुद्रातील प्रदीर्घ प्रवासानंतर मुंबईऐवजी थेट सुरतकडे भरारी घेतली. सध्या हा पक्षी महाराष्टÑात आहे.
हवामानाच्या स्थितीनुसार हा पक्षी नागालँड व मणिपूरवरून बांगलादेशमार्गे म्यानमार, चीनकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या भारतात हाहाकार माजविलेल्या फोनी या चक्रीवादळावर या पक्ष्याचे लक्ष आहे. या पक्ष्याच्या प्रवासी मार्गाकडे हे चक्रीवादळ सरकत असून, अशा स्थितीत पक्षी नेमके काय करतो, याची निरीक्षकांना उत्सुकता आहे.
४ नोव्हेंबर २०१८ रोजी मणिपूरमध्ये आणखी अशाच दोन पक्ष्यांना रेडिओ-टॅग लावण्यात आला होता; परंतु चार दिवसांनी मणिपूर (नर) नावाचा हा पक्षी मृतावस्थेत आढळला व तमेंगलोंग (मादी) नामक पक्ष्याचा जाम्बियापासून संपर्क तुटला. (वृत्तसंस्था)